मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांच्या पगारात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा बेसिक पे 90 हजार प्रतिमहिन्यावरुन थेट अडीच लाख झाला आहे. या वाढीनंतर पगार आणि सर्व भत्ते मिळून आता गव्हर्नर यांना 3 लाख 70 हजार एवढा पगार मिळेल.

ही पगारवाढ जानेवारी 2016पासून लागू असणार आहे. त्यामुळं मागील सव्वा वर्षांपासूनची वाढ उर्जित पटेल यांना मिळणार असल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे. दरम्यान, इतर बँकेच्या अधिकाऱ्यांपेक्षाही आरबीआयच्या या अधिकाऱ्यांचे पगार तुलनेनं फार कमी होतं. त्यामुळे त्यांच्या पगारात ही वाढ करण्यात आली आहे.

या पगारवाढीमुळे आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचं वेतन आता कॅबिनेट सचिवांच्या बरोबरीचं झालं आहे. तर डेप्युटी गव्हर्नर यांचं मासिक वेतन आता सचिव स्तरांच्या अधिकाऱ्यांच्या इतकं झालं आहे. आरबीआयच्या चार डेप्युटी गव्हर्नरच्या पगारातही वाढ करण्यात आली आहे. त्यांची बेसिक सॅलरी 80 हजाराहून 2.25 लाख करण्यात आली आहे.

उर्जित पटेल यांनी सप्टेंबर 2016 पासून आरबीआयचे गव्हर्नर म्हणून पदभार सांभाळला. माजी गव्हर्नर रघुराम राजन हे 3 सप्टेंबरला पदमुक्त झाले होते.