मुंबई : गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळावा यासाठी रासपचे दौंडमधील आमदार राहुल कुल यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. कर्जमाफी नाकारत असल्याचं पत्र राहुल कुल यांनी राज्य सरकारला लिहिलं आहे.


राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्यावर शेतीसाठी घेतलेलं 20 लाखाचं कर्ज आहे. मात्र आपलं कुटुंब ते कर्ज फेडण्यासाठी सक्षम आहे, त्यामुळे आपणास कर्जमाफीतून वगळण्यात यावं असं कुल यांनी पत्रात म्हटलं आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सक्षम शेतकऱ्यांनी कर्जमाफी नाकारण्याबाबत केलेल्या आवाहनानंतर कुल यांनी हा निर्णय घेतला.



मी नियमितपणे कर्जाची परतफेड करत असून, कर्जमाफीच्या योजनेतून मला वगळण्यात यावं, अशी विनंती कुल यांनी केली आहे. राहुल कुल यांनी इतर सधन शेतकऱ्यांनाही कर्जमाफी नाकारण्याचं आवाहन केलं आहे.

यापूर्वी अंमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील आणि त्यांच्या पत्नी पुष्पलता यांनीही कर्जमाफी नाकारली होती. आमदारपद भूषवल्यानं आपणास निवृत्तीवेतनाचा लाभ मिळतो. त्यामुळे सरकारी कर्जमाफीच्या यादीतून वगळण्याची विनंती पाटील यांनी केली होती.