मुंबई: दहावीत नापास झालेल्या एका झोपडपट्टीतील मुलाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर, देशातल्या अवघड समजल्या जाणाऱ्या जेईई परीक्षेत यश मिळवलंय.
मासूम फारुकी असं या 17 वर्षीय मुलाचं नाव आहे. मासूम फारुकी हा तीन वर्षापूर्वी दहावीच्या परीक्षेत नापास झाला होता. मात्र न खचता जोमाने अभ्यास करुन मासूमने जेईई परीक्षेत यश मिळवलं.
मासूमने 2593 रँक मिळवली आहे. त्यामुळे तो आता नामांकित समजल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटीमध्ये इंजिनिअरिंग करणार आहे. मासूमला मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेशाची अपेक्षा आहे.
मासूमच्या या यशामुळे त्याचं कुटुंब आणि तीन भावंडं आनंदाने हरखून गेले आहेत.
मासूमचं कुटुंब वांद्र्यातील झोपडपट्टीत राहतं. क्रिकेटवेड्या मासूमला क्रिकेटमध्येच करिअर करायचं होतं. त्यामुळे तो नेहमीच मैदानावर पडून असायचा. त्याचाच फटका त्याला दहावी बोर्डाच्या परीक्षेत बसला होता.
ऑफ स्पिनर असलेल्या मासूमची मुंबईच्या 16 वर्षाखालील संघात निवडही झाली होती. मात्र त्याचं कुटुंब आवश्यक ओळखपत्र देऊ न शकल्यामुळे त्याची संधी हुकली होती.
मग मासूमची मोठी बहीण तरन्नूमने त्याची दहावीच्या परीक्षेची तयारी करुन घेतली. नापास झालेल्या मासूमने मग दहावीच्या परीक्षेत तब्बल 78 टक्के गुण मिळवले.
मासूमची बुद्धी आणि आत्मसात करण्याची क्षमता ओळखून, तरन्नूमने त्याच्याकडून आयआयटीची तयारी करण्यास बजावलं होतं. त्याचंच फळ म्हणजे जेईई परीक्षेत मिळालेलं यश होय.
आयआयटीची तयारी करायचं ठरवलं होतं, मात्र त्यासाठी आवश्यक कोचिंग क्लास आणि त्याची फी हे मासूमच्या कुटुंबाला न परवडणारी होती.
त्याचवेळी तरन्नूमने 'रेहमानी मिशन' या संस्थेशी संपर्क साधला. पाटण्यातील या संस्थेने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकार घेतला होता. या संस्थेने मुंबईतील अंजुम ए इस्लाम ट्रस्टच्या मदतीने जेईई परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला होता.
या संस्थेने प्रायोगिक तत्वावर मुंबईत मोफत प्रशिक्षण सुरु केलं होतं. त्याचा लाभ मासूमने घेतला.
दरम्यान मासूमच्या इंजिनिअरिंगचा सर्व खर्चही हीच ट्रस्ट करणार आहे. अंजुम ए इस्लाम ट्रस्टचे अध्यक्ष झहीर काझी यांनी ही माहिती दिली.