मुंबई : आपण चंद्रावर पोहोचलो नाही म्हणून काय झालं. चंद्र तर थेट मुंबईतल्या रस्त्यावर उतरलाय, अशा आशयाचं गाणं तयार करुन आर.जे मलिष्कानं पुन्हा एकदा खड्ड्यांवरुन मुंबई महापालिका आणि प्रशासनाची पोलखोल केली आहे. 'चांद जमीन पर' म्हणजेच चंद्र उतरला रस्त्यावर या मथळ्याखाली हे गाणं मलिष्कानं तयार केलं आहे. यामध्ये ती सजलेल्या अनोख्या रुपात दिसत आहे.


सध्या आर.जे मलिष्कानं सादर केलेलं मुंबईतल्या खड्ड्यांवरचं व्यंग चांगलंच गाजतंय. आज मुंबई महापालिकेतही मलिष्काच्या याच व्हिडीओची चर्चा होती. खड्ड्यांवरुन याआधीही बीएमसीला खडे बोल सुनावणाऱ्या मलिष्काचा हा व्हिडीओ मात्र पालिका सत्ताधाऱ्यांना चांगलाच झोंबला आहे. मलिष्काला मुंबईची पुरेशी जाण नाही. यंदाच्या वर्षी पालिकेच्या आयुक्तांनी स्वत: मलिष्काला पालिकेची मान्सूनपूर्व तयारी कशी आहे हे दाखवलं होतं. त्यानंतर मलिष्कानं पालिकेचं कौतुकही केलं. मात्र, आता पुन्हा अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करुन मलिष्का नेमकं काय साध्य करु पाहतेय असा उलट सवाल सत्ताधारी शिवसेनेनं  मलिष्काला केला आहे.



मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मलिष्काला मुंबईची समज नाही असं म्हणलं आहे. "यापूर्वी मलिष्काला पालिका पावसाळ्यापूर्वीच कसं काम करते हे दाखवून झालंय. खुद्द आयुक्तांनी मलिष्कासोबत आपातकालीन विभाग, मुंबईतील पंपिंग स्टेशन्स यांचा दौरा केला होता. मात्र, तरीदेखील केवळ टीका करायची म्हणून अशी गाणी रचली जातात. खड्डयांबाबत प्रशासन आपलं काम करत आहे. वेबसाईट, ट्विटरद्वारे खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त होतात. सोबतच, पालिकेचे कर्मचारी स्वत: ठिकठिकाणी जाऊन खड्डे भरत आहेत. तक्रारी प्राप्त होताच मुंबईतील खड्डे भरले जातायेत.'' असं यशवंत जाधव यांनी सांगितलं आहे. मात्र, विरोधकांनी मलिष्काच्या या गाण्यानंतर तरी प्रशासनाचे डोळे उघडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



दोन वर्षांपूर्वी मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय का? असं म्हणत पालिकेवर उपहासात्मक टीका करणाऱ्या आरजे मलिष्काने गेल्यावर्षीही खड्ड्यांवर गाणं तयार केलं होतं. ते गाणं देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. सैराट सिनेमातील झालं झिंग झिंगाट गाण्याच्या धर्तीवर मलिष्कानं 'गेली गेली मुंबई खड्ड्यात' गाणं तयार केलं होतं. आता पुन्हा या अनोख्या रुपात येत  मलिष्काचं खड्ड्यांवरचं गाणं चांगलंच व्हायरल होत आहे.