ठाणे/ मिरा-भाईंदर : राज्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे साथीचे आजारही बळावले आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये पावसामुळे साचलेलं पाणी, उंदीर
आणि घाणीचं साम्राज्य असलेल्या साथीचे आजार पसरण्याची भीती आहे.


पावसाच्या दिवसात थंडी, ताप, सर्दी अशा छोट्यामोठ्या दुखण्यांसह डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस यासारख्या आजाराचीही लागण झालेली दिसत आहे.

ठाण्यात स्वाइन फ्लूमुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. खुद्द पालिकेचे नवनिर्वाचित अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनाच स्वाइन फ्लू झाल्याचे आता समोर आले आहे. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये तब्बल 670 रुग्ण आढळून आले आहेत.

ठाण्यातील स्वाईन फ्लूचे एकूण रुग्ण 292
मृत्यू- 16

कल्याण, डोंबिवली - 144 रुग्ण
मृत्यू - 4

मिरा-भाईंदर - 69 रुग्ण
मृत्यू - 5

वसई - 74 रुग्ण
मृत्यू - 6

उल्हासनगर - 1 रुग्ण
मृत्यू - 0

भिवंडी - 3 रुग्ण
मृत्यू - 0

रायगड नगरपालिका - 3
मृत्यू - 0

नवी मुंबई - 53
मृत्यू- 0

एकूण - 670

स्वाईन फ्लूची लस जरी उपलब्ध झाली असली तरीही रुग्णांची संख्या वाढल्यानं मागणी वाढली आहे. परिणामी लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

तिकडे मिरा-भाईंदरमध्येही स्वाईन फ्लूनं थैमान घातलं आहे. इथं पाच रुग्णांचा जीव गेल्यानंतर महापालिका जागी झाली आहे.

ताप येणे, खोकला, नाक गळणे, घशात खवखव, घसा दुखणे, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या, घशाला सूज येऊन तीव्र वेदना होणे, धाप लागणे आदी लक्षणे स्वाईन फ्लूने आजारी असलेल्या व्यक्तीमध्ये दिसतात.

संसर्ग टाळण्यासाठी काय कराल?

स्वाईन फ्लू संसर्गजन्य असल्यानं लोकांनी सार्वजनिक ठिकाणी दक्ष रहावं. संसर्गजन्य व्यक्तीला हस्तांदोलन करणं टाळावं. भरपूर विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी प्यावं. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषध घेऊ नयेत.

कुठलाही आजार होण्यापेक्षा आधीच खऱबदारी घेतली तर कधीही चांगलं. त्यामुळे काळजी घ्या आणि आजारी पडू नका