मुंबई : मुंबईत दोन ते अडीच लाख रुपये किंमत असलेल्या रिक्षा चोरून त्या कल्याण, भिवंडी, डोंबवली मधील गावात नेऊन अवघ्या आठ ते दहा हजार रुपयांना विकणाऱ्या एक टोळीला नवघर पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. सिद्धेश सुनील मांढरे,  विक्रांत नितीन जाधव अशी यातील मुख्य आरोपींची नावे आहेत. 


हे टोळकं रिक्षा चोरायचे आणि साईनाथ दिलीप पाटील, रमेश वामन सुरोशे यांना विकायचे. नंतर हे दोघं या रिक्षा गावाकडे जाऊन विकायचे. या चार जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून आतापर्यंत नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरण्यात आलेल्या सात आणि इतर मुंबईत चोरलेल्या सात अशा एकूण चौदा रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. 


नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात रिक्षा चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व चोरीचा नवघर पोलीस शोध घेत होते. 16 डिसेंबरला हे पथक रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत असताना मध्यरात्री सिद्धेश आणि विक्रांत हे आरोपी संशयास्पदरित्या स्टेशन बाहेर फिरताना त्यांना आढळून आले. पोलिसांकडे असलेले फुटेज आणि हे संशयित मिळते जुळते होते. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आणि तिथे कसून चौकशी केली. या दोघांची चौकशी केली असता त्यांनी आपण रिक्षा चोरण्यास आलो असल्याचे कबुल केलं. तसेच या अगोदरही इथून रिक्षा चोरल्या असल्याचे त्यांनी कबूल केले. 


आता पर्यंत मुलुंड, वाकोला, कोपरी, डोंबिवली इत्यादी विभागातून चोरलेल्या 14 रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. निर्जन स्थळी उभ्या असलेल्या रिक्षांची ही टोळी रेकी करीत असत. त्यानंतर त्या रिक्षा त्यांच्यांकडे असलेल्या इलेक्ट्रॉनिक सर्किटने चालू करून त्या भिवंडी, मुरबाड, कल्याण भागात नेऊन इतर दोन साथीदारांना विकत असत. दोन ते अडीच लाख रुपयांची रिक्षा अवघ्या आठ ते दहा हजार रुपयांना हे आरोपी विकत होते.


महत्त्वाच्या बातम्या :