मुंबई : सन 2014 मध्ये मालाड इथं झालेल्या शिवसेना गटप्रमुख रमेश जाधव यांच्या हत्येप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयानं गुरूवारी चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर एका महिला आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तर अन्य एका अल्पवयीन आरोपीवर खटला प्रलंबित आहे. 


रमेश जाधव यांच्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी दोन आरोपींनींच जाधव यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेल्याचा दावा आरोपीच्या भावांकडून कोर्टात करण्यात आला. परंतु, आरोपींच्या उलटतपासणीत, याबाबत रुग्णालयातील त्यांचा प्रवेश दाखवणारे सीसीटीव्ही फुटेज ते न्यायालयात सादर करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा युक्तिवाद विश्वासहार्य नसून ते आपल्या भावांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं. त्याची दखल घेत न्यायालयानं चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर बाल न्याय मंडळात खटला न्यायप्रविष्ट असून या घटनेनंतर उसळलेल्या दंगलीमधली कथित दंगल खोरांविरोधातील खटलाही अद्याप प्रलंबित आहे. 


काय घडली होती घटना?
रमेश जाधव यांच्या चुलत भावानं केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका इसमाला अन्सारी, युसूफ साजिदा, इमरान काझी आणि एक अल्पवयीन मुलगा एकाला मारहाण करत होते. जेव्हा जाधवांच्या चुलत भावाननं यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या टोळक्यानं त्यालाही मारहाण केली. म्हणून त्यांनी रमेश जाधव यांना बोलावून घेतलं. जाधव तिथे आल्यावर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी युसुफ आणि इमरान यांनी जाधव यांना भिंतीवर ढकललं आणि अन्सारीनं त्यांच्यावर चाकूनं वार केले.


तिथे असलेला चौथा आरोपी युसूफ उर्फ गुल्लु साजिदानं त्यांच्यावर गुप्तीने वार केले. यामध्ये जाधव जबर जखमी झाले आणि त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी रोजी सर्व आरोपींना अटक करून हत्या, कट कारस्थान, गंभीर मारहाण इत्यादी कलमांतर्गत गुन्हे नोंदवले. या खटल्यात एकूण 20 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासण्यात आले. पोलिसांना घटनास्थळी लोखंडी सळ्या, रक्ताळलेले कपडे आणि अन्य हत्यारं सापडली. तर चौथा आरोपी गुल्लुनं लपवलेले कपडे स्वतःहून पोलिसांना दिल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टाला दिली. या खटल्यात तीन प्रत्यक्षदर्शींची साक्ष आणि सीसीटीव्ही फुटेज, न्यायवैद्यकीय अहवाल महत्त्वाचा ठरला.


महत्त्वाच्या बातम्या :