मुंबई : मुंबईकरांना पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरासह आजपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. आजपासून मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रिक्षाचे भाडे 18 रुपयांवरुन 21 रुपये तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये झाले आहे. मुंबई एमएमआर रिजनमध्ये ही भाडेवाढ लागू असणार आहे. आजपासून ही भाडेवाढ लागू होईल तर 31 मेपर्यंत मीटरमधील बदलांची प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं होतं.


रिक्षाच्या दरात कशी झाली वाढ
रिक्षाचे दरात तीन रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता रिक्षाच्या पहिल्या टप्प्याला 18 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला 14.20 पैसे मोजावे लागणार आहेत. 1 मार्च 2021 पासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.


टॅक्सीच्या दरात अशी वाढ
टॅक्सीच्या दरात 22 रुपयांऐवजी 25 रुपये मोजावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यानंतर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला 16 रुपये मोजावे लागणार आहेत. 1 मार्च ते 31 मेपर्यंत कार्डनुसार हे भाडे आकारता येणार आहे. त्यानंतर 1 जूनपासून मीटरमध्ये बदल झाला पाहिजे. गेल्या 6 वर्षांपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे भाडेवाढ करण्यात आली आहे, अनिल परब यांनी सांगितलं होतं.


टॅक्सीचे दर


किमी              आधीचे दर           वाढीव दर


१.५०             २२ रु                      २५ रु


२.५०              ३७ रु                    ४२ रु


३.५०             ५२ रु                     ५९ रु


४.५०             ६७ रु                    ७६ रु


५.५०             ८२ रु                     ९३ रु


(रात्री १२ पासून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरुवातीच्या दिड किलोमीटरसाठी २८ रुपयांऐवजी ३२ रुपये भाडे द्यावे लागेल)


काळी-पिवळी रिक्षा दर (सीएनजी)


किमी             आधीचे दर                   वाढीव दर


१.५०                 १८ रु                         २१ रु


२.५०                 ३० रु                        ३६ रु


३.५०               ४३ रु                           ५० रु


४.५०              ५५ रु                          ६४ रु


५.५०               ६७ रु                         ७८रु


(रिक्षाचे रात्री १२ पासूनचे किमान दीड किलोमीटरचे भाडे २३ रुपयांवरुन २७ रुपये होईल)