कल्याण : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे खबरदारी घेण्याचं आवाहन वारंवार नागरिकांना केलं जात आहे. खासकरुन मास्क  लावण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने देखील नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे मास्क  वापरण्यासह सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असं आवाहन केलं आहे. मात्र उल्हासनगरमध्ये मास्क न घातलेल्या तरुणांना पोलिसांनी अडवलं म्हणून उलट तरुणांनी पोलिसांनाचा शिवीगाळ केली.


मात्र काही बेजबाबदार नागरिकांकडून निष्काळजीपणा सुरू असल्याने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईस काही मुजोर बेजबाबदार नागरिक विरोध करतात. त्यातूनच अनेकदा वाद घडताना दिसतात. उल्हासनगरमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेत एका मुजोर तरुणाने चक्क पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावत जाऊन त्यांना शिवीगाळ केली.

उल्हासनगर श्रीराम चौक येथे पोलिसांची कारवाई सुरू होती. या कारवाई दरम्यान विना मास्क दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी अडवलं. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू असताना या दोन मुजोर तरुणांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात या दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई धडक कारवाई, एका दिवसात 46 लाखांची दंड वसुली


राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती


राज्यात 28 फेब्रुवारी म्हणजे काल पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली.  24 तासाच महाराष्ट्रात 8 हजार 293 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोबतच काल कोरोनामुळे 62 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 3753 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात एकूण 20 लाख 24 हजार 704 रुग्ण बरे घरी परतले आहेत. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 77 हजार 008 आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70 टक्के झालं आहे.


Maharashtra Covid 19 Case: राज्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येचा आलेख चढताच! निर्बंध वाढवण्याची शक्यता


विदर्भात कोरोनाचा उद्रेक


राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज या तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.