मुंबई : 'फेमिना मिस इंडिया 2020' ची रनर अप मान्या सिंह हिचा इथवरच प्रवास सोपा नव्हता. तिच्या संघर्षाची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. मान्या सिंह उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमधील आहे, मात्र मुंबईत लहानाची मोठी झाली. मान्याचे वडील मुंबईत रिक्षाचालक आहेत आणि जेव्हा मान्या लहान होती तेव्हा घरात दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत होता. अशा परिस्थितीत मान्याला घरात अनेकदा इतर सदस्यांप्रमाणे उपाशी झोपावं लागत होतं.


'फेमिना मिस इंडिया 2020' ची रनर अप बनल्यानंतर, मान्या सिंहने एबीपी न्यूजशी खास संवाद साधला. त्यात तिने सांगितले की, मी वयाच्या 14 व्या वर्षापासून काम करण्यास सुरुवात केली. मी 'पिझ्झा हट' मध्ये काम करत होते आणि मी लोकांची भांडी देखील घासली आहेत. माझ्या आयुष्यात मी लोकांची बुट देखील पॉलिश केले आहेत, असं मान्याने सांगितलं.


मान्याने आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत सुधार व्हावा यासाठी कॉल सेंटरमध्येही काम केले. मान्या सांगते, मी कॉलेजला असताना विचार करायची की माझ्या आई-वडिलांना असं वाटायला नको की घरात एखादा मोठा मुलगा असयला हवा होता, ज्याने दोन पैसे कमावले असते. मान्याला एक छोटा भाऊ आहे जो सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.



मान्याचे वडील मोठ्या अडचणीतून घराचा गाडा हाकत होते. अशा परिस्थितीत आई-वडिलांकडे मान्याच्या शालेय शिक्षणासाठी देखील पैसे नव्हते. माझ्या पालकांनी माझ्या शाळेत हात जोडून सांगितले होते की, आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी ते पैसे देऊ शकत नाहीत. पण तिला शाळेत शिक्षण घेण्याची परवानगी देण्यात यावी. दरवर्षी ते फक्त परीक्षा शुल्क देत होते. अशा परिस्थितीत मी दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजची फी भरण्यासाठी आईने तिची चांदीची साखळी देखील विकली होती, असं मान्याने सांगितलं.


कॉल सेंटरमध्ये काम करण्याचा हेतू फक्त पैसे मिळवून घर चालवणे नव्हता, तर सौंदर्य स्पर्धेचाही एक भाग होता. मान्याने सांगितलं की, कॉल सेंटरमध्ये काम करत असताना मला कसे बोलायचे हे शिकण्याची इच्छा होती. माझी जीवनशैली मला सुधारायची होती आणि माझा आत्मविश्वास वाढवायचा होता. घरातील खराब वातावरणामुळे एकदा मान्या गोरखपूरहून ट्रेनमध्ये एकटी आली होती. या तीन दिवसांच्या प्रवासात मान्याकडे पैसे नव्हते म्हणून ती उपाशीच होती. असा मान्याचा खडतर प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.