मुंबई : रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या बहिणींविरोधात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात आलेल्या दोनपैकी एकीला दिलासा मिळालाय तर दुसरीच्या पदरी मात्र निराशाच पडलीय. मीतू सिंह हिच्याविरोधातील तक्रार रद्द करण्याचे आदेश सोमवारी हायकोर्टानं जारी केलेत. मात्र, प्रियंका सिंह हिच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याचं कोणतंही कारण दिसत नसल्याचं स्पष्ट करत हायकोर्टानं तिला दिलासा नाकारला आहे. याविरोधात आता प्रियंका सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांचे वकील माधव थोरात यांनी एबीपी माझाला सांगितलं. या याचिकेवर 7 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठानं राखून ठेवला आपला निकाल सोमवारी जाहीर केला.
सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींविरोधात आलेल्या तक्रारीवरून आम्ही रितसर गुन्हा नोंदवला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आम्ही तो गुन्हा आता सीबीआयकडे सुपूर्दही केला आहे. सुशांतच्या मोबाईलवरून जी माहिती मिळालीय त्यात सुशांतची बहीण प्रियंकानं त्याला बनावट प्रिस्क्रिप्शन बनवून एनडीपीएस कायद्यानं प्रतिबंधीत केलेली औषधं मिळवून दिल्याचे पुरावे मिळाले आहेत. ज्याचा तपास होणं गरजेचं असल्याचा दावा मुंबई पोलिसांतर्फे हायकोर्टात करण्यात आला.
काय होते रिया चक्रवर्तीचे आरोप?
तर आत्महत्येला प्रवृत्त करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला आत्महत्येसाठी मदत करणं हा जास्त मोठा गुन्हा आहे, ज्यासाठी जन्मठेपेच्या शिक्षेचीही तरतूद आहे. असं सांगत जोपर्यंत आपण सुशांतसोबत होतो तोपर्यंत त्याला सांभाळतच होतो. रिया त्याच्या घरातून बाहेर पडली आणि काही दिवसांतच सुशांतनं हे टोकाचं पाऊल उचललं. यासाठी सुशांतच्या घरचेच जबाबदार आहेत, असा दावा करत आपण दाखल केलेल्या तक्रारीवर ठाम आहोत असं रिया चक्रवर्तीच्यावतीनं ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टाला सांगितलं होतं.
Drug Case | एनसीबीकडून अभिनेत्री दीया मिर्झाची माजी मॅनेजर राहिला फर्निचरवालाला अटक
सीबीआयची भूमिका
रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या बहिणींवर केलेले हे आरोप हा केवळ एक तिचा एक अंदाज आहे, त्यामुळे यावर मुंबई पोलिसांनी थेट गुन्हा कसा दाखल केला? तसेच सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे, याची मुंबई पोलिसांना पूर्ण कल्पना होती त्यामुळे त्यांनी रियाची तक्रार परस्पर नोंदवून न घेता ती सीबीआयकडे पाठवायला हवी होती अशी भूमिका अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सीबीआयच्यावतीनं हायकोर्टात स्पष्ट केली.
प्रकरण नेमकं काय?
सुशांत सिंह राजपूतच्या बहिणी प्रियंका व मीतू यांनी बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे सुशांतला प्रतिबंधीत औषधं देण्यात येत होती. त्यामुळे त्याची मानसिक आजार बळावला अशी तक्रार रिया चक्रवर्तीनं मुंबई पोलिसांना दिली आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या दोन्ही बहिणींनी हायकोर्टात धाव घेत ही एफआयआर रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. सुशांतची एक बहीण दिल्लीतील डॉक्टराच्या मदतीने बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे सुशांतला प्रतिबंधीत औषधं देत होती, असा आरोप रियानं केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वांद्रे पोलीस स्थानकात 7 सप्टेंबर रोजी सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंह आणि मीतू सिंह या दोघींवर गुन्हा दाखल केला आहे.