मुंबई : शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढली आणि त्यामुळे राज्यावर आर्थिक हलाखीची परिस्थिती ओढवल्याचा दावा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. तसेच, भाजपच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.


इतकेच नव्हे, तर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत वित्त आयोगालाच दोषी धरलंय. राज्याची बाजू मांडताना वित्त आयोगाचे निष्कर्ष चुकीचे असल्याचा आरोप भातखळकर यांनी केलाय.

अतुल भातखळकर नेमकं काय म्हणाले?

“महसुली तुटीच्या बाबत बोलायचे झाल्यास, गेल्या वर्षी तुटीची स्थिती असली, तरी आता मात्र राज्य महसुलाच्या बाबतीत सुस्थितीत आहे. गेल्या वित्तीय वर्षात शेतकऱ्यांना दिलेली 17 हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी वित्तीय तुटीला कारणीभूत होती.”, असे भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले.

महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबाबत 15 व्या वित्त आयोगाने जे निष्कर्ष मांडले, त्यावरही अतुल भातखळकर यांनी टीका केली. वित्त आयोगाचे निष्कर्ष चुकीच्या तथ्यांवर आधारित असल्याचा आरोप भातखळकरांनी केला.

दरम्यान, भाजपच्या काळात राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्याचा दावाही भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला.