औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातून आक्रमक झालेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आता माझा शिवसेनेशी काहीही संबंध राहिला नसल्याचे स्पष्ट केलं आहे. हर्षवर्धन जाधव यांनी नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा केलीय. येत्या दीड महिन्यात या नव्या पक्षाची स्थापना होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पक्ष म्हणून शिवसेना काय करेल, ते ठरवतील पण आता माझा शिवसेनेशी काहीही संबंध राहिलेला नाही. उद्धव ठाकरे यांनी मला मराठा आरक्षणावर बोलू नका असे सांगितल्याची धक्कादायक माहितीही हर्षवर्धन जाधव यांनी दिली. या माहितीमुळे राज्यात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
औरंगाबादमध्ये आज (मंगळवार) मराठा समाजासह आरक्षणाची मागणी करणाऱ्या सर्व धर्माची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नवा पक्ष काढण्यात येणार असून सामाजिक समरसतेसाठी आणि आरक्षणाच्या मागणीसाठी हा पक्ष असल्याचं त्यांनी सांगितले.
कोण आहेत हर्षवर्धन जाधव?
हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत. विविध वक्तव्यांमुळे ते नेहमी चर्चेत असतात. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण औरंगाबाद दौऱ्यावर असताना हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय पोलिसांनीही हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केली होती.
हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात मनसेतून केली. ते मनसेचे आमदार होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि कन्नडमधून निवडणूक लढवत विजय मिळवला.
शिवसेनेशी काहीही संबंध नाही, नवा पक्ष काढणार : हर्षवर्धन जाधव
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
18 Sep 2018 09:00 PM (IST)
उद्धव ठाकरे यांनी मला मराठा आरक्षणावर बोलू नका असे सांगितल्याची धक्कादायक माहितीही हर्षवर्धन जाधव यांनी दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -