Mumbai News : मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानातून होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना दमा आणि इतर श्वसनाचे आजार जडत आहेत. त्यामुळे रहिवाशांनी या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे धाव घेतली आहे. मुंबई महापालिकेच्या शिवाजी पार्क नूतनीकरण आणि धुळीचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी हिरवळ तयार करण्याच्या प्रकल्पाचे तीन तेरा वाजल्याचं चित्र आहे. त्यामुळे पार्कात सभा घेणाऱ्या राजकीय पक्षांना रहिवाशांना होणारा त्रास कळणार का? हा प्रश्न शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांनी विचारला आहे. पाहूया धुळीचे साम्राज्य पसरलेल्या शिवाजी पार्कचा रिपोर्ट


दृश्यांमध्ये तुम्ही जे पाहताय हे कुठलं वादळ नसून शिवाजी पार्कवर उडणारी धूळ आहे... शिवाजी पार्क परिसरातील रहिवासी धुळीमुळे मागील अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. या धुळींच्या कणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं यांना श्वसनाचे आजार जडले आहेत. शिवाजी पार्क धूळमुक्त व्हावं यासाठी कंत्राट काढण्यात आले. रेन वॉटर हार्वेस्टिंग, तुषार सिंचन यासारखे प्रकल्प हाती घेऊन शिवाजी पार्कवर हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शिवाजी पार्कवर ना हिरवळ आली, नाही शिवाजी पार्क धूळमुक्त झालं. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्याची वेळ इथल्या रहिवाशांवर आली.


शिवाजी पार्क धूळमुक्त व्हावं यासाठी नेमके काय प्रयत्न केले हे जाणून घेऊया


* शिवाजी पार्क धूळमुक्त व्हावं यासाठी ऑक्टोबर 2021 मध्ये माती टाकण्याचे काम सुरु झालं
* मुंबई महापालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि तुषार सिंचन प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण केल्याची माहिती आहे
* शिवाजी पार्क नूतनीकरण आणि धूळमुक्त व्हावं यासाठी शिवाजी पार्क देखभालीसाठी तीन वर्षाचं 1 कोटीचे कंत्राट मागील सरकारने दिले
* मात्र शिंदे फडणवीस सरकारने हे कंत्राट रद्द करुन खाजगी कर्मचाऱ्यांच्या मदतीने देखभालीचे काम सुरु ठेवले


मात्र ज्यावेळी मातीचे ढिगारे ऑक्टोबर 2021 मध्ये शिवाजी पार्कवर टाकण्यात आले त्या दिवसापासून धुळीच्या प्रदूषणात लक्षणीय वाढ झाल्याचं रहिवाशांचे म्हणणं आहे.


शिवाजी पार्कवर असंख्य लोक व्यायामासाठी, जॉगिंगसाठी आणि फेरफटका मारण्यासाठी येत असतात. या भागात शाळा देखील आहेत आणि याच शिवाजी पार्कवर उडणाऱ्या धुळीकणांमुळे श्वसनाचे आजार आणि दमा जडत असल्याच्या अनेक तक्रारी या भागात राहणाऱ्या डॉक्टरांकडे येत आहेत आणि त्यामुळे पालक वर्ग सुद्धा चिंतेत आहे.


याच शिवाजी पार्कवर हजारो कार्यकर्त्यांची गर्दी जमवून शक्ती प्रदर्शन करणारे पक्ष, सभेसाठी शिवाजी पार्क मिळावे म्हणून भांडणारे पक्ष आणि कोट्यवधी रुपये खर्च करुन मुंबईत सुशोभीकरण करणारे राज्य सरकार आणि मुंबई महापालिका... या आपल्या शिवाजी पार्कला धूळमुक्त करुन हा नागरिकांचा त्रास कसा कमी करणार? याचे उत्तर राज्य सरकार, बीएमसी प्रशासन आणि सर्व पक्षांकडून मिळावं आणि यासाठी तातडीने प्रयत्न केले जावे, अशीच या ठिकाणच्या त्रस्त झालेल्या रहिवाशांची अपेक्षा आहे.