Mumbai Crime : तुम्ही तुमच्या चिमुकल्यांना प्लेग्रुपमध्ये (Play Group) पाठवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण मुंबई (Mumbai) पश्चिम उपनगरातील कांदिवलीमध्ये (Kandivali) शिक्षकांकडून (Teacher) चिमुकल्यांना (Children) त्रास देण्याचा, मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आपण मुलांना शिकण्यासाठी, तिथे रममाण होण्यासाठी प्लेग्रुपमध्ये पाठवतो की शिक्षकांकडून मारहाण करुन घेण्यासाठी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोन शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विद्यार्थ्यांना क्रूर मारहाण
कांदिवली येथील राईम्स अँण्ड रम्बल्स प्लेग्रुपमध्ये ही धक्कादायक घटना झाली असल्याचे समोर आलं आहे. इथल्या महिला शिक्षकांची दोन ते अडीच वर्षांच्या मुलांना हाताने मारहाण करताना, हाताला धरुन फरपटत नेताना, हाताने गालाचे चिमटे घेताना, पुस्तकाने डोक्यावर मारताना, तसंच मुलांना उचलून बाजूला आपटताना अशा क्रूर वागणूकीचे प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत.
कसा उघड झाला प्रकार?
फिर्यादी महिलेच्या दोन वर्षीय मुलाच्या वागणुकीत मागील काही दिवसांपासून बदल जाणवत होता. मुलगा थोडा रागीट होऊन घरातील लोकांच्या अंगावर मारण्यासाठी येत होता. पालकांनी इतर मुलांच्या पालकांची चौकशी केली असता त्यांची मुले सुद्धा घरामध्ये अशीच वागत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पालकांनी मग प्लेग्रुपच्या मालकांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर मार्च 1 ते मार्च 27 पर्यंतचे सीसीटीव्ही फूटेज चेक केलं असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
दोन शिक्षिकांविरोधात गुन्हा
या प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी थेट कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या दोन शिक्षिकांविरुद्ध तक्रार दाखल केली. प्रकाराचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी प्रमुख शिक्षिका जिनल छेडा आणि सहशिक्षिका भक्ती शहा या दोघींविरोधात बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अभिनियम 2000 कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान या प्लेग्रुपमध्ये एकूण 28 मुले आहेत आणि या शिक्षिकांनी किती मुलांचा अशाप्रकारे छळ केला आणि मारहाण केली आहे, याचा सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून पोलीस तपास करत आहेत.
आई-वडील नोकरदार असतात, त्यामुळे मुलांना सांभाळण्यासाठी कोणी नसतं, मुलांना इतर मुलांसोबत राहण्याची, खेळण्याची सवय व्हावी, यासाठी बरेच पालक आपल्या मुलांना बेबी डे केअर, प्लेग्रुप, नर्सरीमध्ये टाकतात. परंतु कांदिवलीमधील हा प्रकार पाहून मुलं सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पालकही धास्तावले आहेत.