मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI ने Paytm पेमेंट बँकेला मोठा झटका दिला आहे. केवायसीच्या नियमांचा भंग केल्याने रिझर्व्ह बँकेने Paytm ला मोठा दंड ठोठावला आहे. आरबीआयनं पेटीएम पेमेंट्स बँकेला 5.39 कोटी रुपयांचा दंड सुनावला आहे. आरबीआयची ही कारवाई म्हणजे पेटीएमला मोठा झटका मानला जात आहे.


आरबीआयने यापूर्वी 2021 मध्येही पेटीएम बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यावेळी पेटीएमने काही नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा आरबीआयने पेटीएमवर कारवाईचा बडगा उगारला. यावेळी केवायसीचं कारण देत दंडाच्या रकमेत वाढ करुन, 5.39 कोटी इतका दंड सुनावण्यात आला.


पेटीएमवर कारवाई का?


भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पेटीएम या ऑनलाईन पेमेंट बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आलीये. रिझर्व्ह बँकेकडून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी नियमावली दिली जाते. त्याचं पेटीएमने उल्लंघन केल्याने आरबीआयने ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे. ऑनलाईन माध्यमातून आर्थिक व्यवहार करताना फसवणूकीचे प्रकार टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून ऑनलाईन पेमेंट बँकांना आरबीआयकडून नियम घालण्यात येतात. नेमकं याच नियमांचं उल्लंघन पेटीएमकडून करण्यात आलंय. 


आरबीयाकडून दंडात्मक कारवाई 


जागतिक स्तरावर या पेटीएम बँकांचा वापर आर्थिक व्यवहार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते. त्याचसाठी आरबीआय नियमावली जाहीर करते. जर या नियमावलीचं पालन कंपन्यांकडून नाही झालं तर अशा कंपन्यांवर आरबीयाकडून दंडात्मक कारवाई देखील करण्यात येते. तीच कारवाई आता आरबीआयकडून पेटीएम पेमेंट बँकेवर करण्यात आलीये. 


अॅमेझॉन पेमेंटवरही झाली होती कारवाई 


दरम्यान याआधी अॅमेझॉन पेमेंटवर देखील रिझर्व्ह बँकेकडून ही कारवाई करण्यात आली होती. अॅमेझॉनकडून आरबीआयच्या केवायसीच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. त्यामुळे आरबीआयनं ही दंडात्मक कारवाई केली होती. त्यावेळी रिझर्व्ह बँकेकडून अॅमेझॉनला 3.06 कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. 


केवायसी म्हणजे काय? 


केवायसी हे 'नो युअर कस्टमर' याचे संक्षिप्त रुप आहे.  ग्राहकांची खरी ओळख पटवण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. दरम्यान त्याचसाठी बँकांकडून काही नियम लावले जातात. जे ग्राहकांना पूर्ण करावे लागतात. तसेच हे नियम पूर्ण केल्यानंतर ग्राहकांना ऑनलाईन माध्यमातून आर्थिक व्यवहार करता येतात. तसेच यामुळे फसवणूकीच्या प्रकारांना आळा घालण्यास देखील मदत होते. 


हेही वाचा : 


Whatsapp Ban : व्हॉट्सॲपकडून मोठी कारवाई! 74 लाखांहून जास्त भारतीय अकाऊंट बॅन, 'या' कारवाईचं कारण काय?