मुंबई : मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या (Navaratri 2023) निमित्ताने रास दांडियाचे (Ras Dandiya) आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाचा ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा (First Aid) आणि रुग्णवाहिका (Ambulance) तैनात ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहेत. याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. 


राज्यात नवरात्रीच्या नऊ दिवसांत मोठ्या प्रमाणात रास दांडियाचे आयोजन करण्यात येते. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दांडीयाचे आयोजन करण्यात येते. त्यात आयोजकांच्यावतीने अनेकदा प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात असली तरीही काही आयोजक त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दांडियाचे आयोजन करताना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि आयोजनाच्या जागी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका ठेवणे आयोजकांना बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. 


रास दांडिया खेळताना अनेकदा लोकं भान विसरून नाचतात, अशावेळी काही वेळा हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. तसेच कोरोना कालखंडानंतर अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे देखील अनेक अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे बदललेल्या जीवनशैलीमुळे आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोणतीही वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती उदभवल्यास त्या व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असते. ही गरज लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी अशी सुविधा सर्व आयोजकांनी यावेळी उपलब्ध करून द्यावी असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत मुंबईतील 'गुजरात समाचार' या वृत्तपत्राचे संपादक निलेश दवे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्याना तसे निवेदन दिले होते. या निवेदनाला अनुसरून मुख्यमंत्री शिंदे यांनी हे निर्देश दिले आहेत.


मु्ंबईसह राज्यात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांसह व्यावसायिकपणे रास दांडियाचे आयोजन केले जाते. हे आयोजन मोठ्या मैदानात करण्यात येते. त्यामुळे आरोग्यविषयक आणीबाणी उद्भवल्यास दांडिया खेळणाऱ्यावर योग्य आणि तातडीने प्राथमिक उपचार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आता दांडिया आयोजकांना प्राथमिक उपचार सज्ज ठेवण्यासह रुग्णवाहिकादेखील तैनात करावी लागणार  आहे. 


नवरात्रोत्सव मंडळांना परवानगीसाठी 'एक खिडकी योजना'


 दरम्यान,  मुंबईमध्ये 1200  हून अधिक नवरात्रोत्सव मंडळे दरवर्षी अधिकृतरीत्या उत्सवासाठी परवानगी घेतात. नवरात्रोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मुंबई महापालिकेच्यावतीने एक खिडकी योजनेमार्फत देण्यात येणार आहेत. बिगर व्यावसायिक नवरात्रोत्सव मंडळांसाठी परवानगी शुल्क, अग्निशमन शुल्क माफ. केवळ 100 रुपये अमानत रक्कम आकारण्यात येणार आहे. दुर्गामूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था, दिवे, शौचालय, निर्माल्य कलश व्यवस्था करण्यात येणार आहे.