मुंबई : राज्यात कोरोना कालावधीत मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती झाली आहे. ही औषधे सध्या विकली जात नाहीत अशी परिस्थिती आहे. मागच्या काही दिवसांचा विचार केला तर अचानक मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून काही निर्बंध लादले आहेत. यामध्ये सभा घेणे, रॅली काढणे, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणे याला बंदी घातली आहे. माझं असं मत आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय चांगल्यासाठीच घेतला असेल. माझी फक्त त्यांना एवढीच विनंती आहे की, ही बाब फक्त महाविकास आघाडीतील नेते नाना पटोले आणि भाई जगताप यांना देखील सांगा. एकीकडे नाना पटोले भव्यदिव्य ट्रॅक्टर रॅली काढतात तर दुसरीकडे भाई जगताप लॉग मार्च काढतात. यावेळी कोरोना पसरत नाही का? माझा तर संशय आहे की, सध्या जे काही निर्बंध लादण्यात आले आहेत, यामागे फार्मास्यूटिकल कंपन्यांसाठी काही विशेष बाब तर नाही ना? कारण कोरोना काळात मोठ्या प्रमाणात औषधं निर्माण करण्यात आली आहेत. परंतु या औषधांच्या साईड्स इफेक्ट्समुळे ही औषधे खरेदी करण्यासाठी नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या हिताचा तर यामागे विचार नाही ना? आशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे.


आज कृष्णकुंज येथे सोमाटणे टोल नाका राज ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर स्थानिकांना मोफत झाल्यानंतर सर्व पक्षीय नेत्यांच एक शिष्टमंडळ राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी कृष्णकुंजवर आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते. बाळा नांदगावकर सोमटने टोलनाक्याबाबत बोलताना म्हणाले की, मागील आठवड्यात हे सर्व पक्षीय शिष्टमंडळ मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटायला कृष्णकुंज निवास्थानी आले होते. मावळ तालुक्यातील हा फार मोठा विषय अनेक वर्षांपासून पेंडीग होता. याबाबत राज ठाकरेंनी आयआरबीचे मिलिंद म्हस्के आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत बातचीत केली. आणि त्यानंतर आता सोमाटणे टोलनाका आणि तळेगाव दाभाडे टोल नाका स्थानिकांसाठी मोफत करण्यात आला आहे. एमएच 14 टोल नाका पसिंग असणाऱ्या स्थानिकांना याचा फायदा होणार आहे.


राज ठाकरेंच्या आगामी अयोध्या दौऱ्याबाबत बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, "आमची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु देशात कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे शेतकरी आंदोलन सध्या अजूनही सुरु आहे. यासोबतच आमचे सर्व पदाधिकारी 26 किंवा 27 तारखेपर्यंत मुंबईतील सर्व भागात फिरून एक आवाहल तयार करतील त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ."


राष्ट्रवादीचेच मंत्री सध्या पॉझिटिव्ह येतायत अशी चर्चा आहे. या प्रश्नाला उत्तर देताना नांदगावकर म्हणाले की, "आशा प्रकारची कारणं चुकीची आहेत. अधिवेशन व्हायला हवं. हे बजेटरी अधिवेशन आहे. आधीच सरकार बोंबा मारत आहे आमच्या तिजोरीत काहीच नाही. खडखडाट आहे. त्यामुळे अधिवेशन व्हायला हवं. सध्या केंद्र सरकारने, राज्य सरकारने टॅक्स कमी करायला हवेत. इतर राज्यात राज्य सरकार टॅक्स कमी करू शकतं तर आपलं राज्य सरकार का नाही करू शकत? तरच पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात येतील." तसेच सामनात लिहिलेल्या 'चंदा गोळा करण्यापेक्षा पेट्रोल डिझेलचे दर कमी करा' या प्रश्नाला उत्तर देताना बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेला टोला मारताना म्हणाले की, "हिंदुत्वापासून बाजूला गेल्यामुळे त्यांची ती भावना झाली असेल. श्री राम प्रभूंवर आमची नितांत श्रद्धा आहे. एक एक रुपया द्यायला लागला तरी आम्ही तयार आहोत आणि दुसरी बाब मनमोहन सिंग असताना 121 रुपये पर बॅलर दर होता आता 63 रुपये आहे. त्यामुळे केंद्राने आणि राज्य सरकारने टॅक्स कमी करावा. केंद्र सरकार करेल तेव्हा करेल राज्य सरकारने करायलाच पाहिजे. हे सापनाथ आणि दुसरे नागनाथ हे असेच आहेत."


महत्त्वाच्या इतर बातम्या :