मुंबई : देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरात देण्यात येणाऱ्या प्रसादावरुन चांगलंच वादंग निर्माण झालं आहे. याप्रकरणाची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत तक्रार गेली. त्यानंतर, मुंबईतील प्रसिद्ध आणि भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धीविनायक गणेश (Siddhivinayak Mandir) मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये उंदीर असल्याचा दावा करणारे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. येथील मंदिराच्या प्रसादात उंदरांची पिल्लं आढळली आहेत. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Video viral) झाल्यानंतर मंदिर परिसरातील स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यामुळे, सिद्धीविनायक मंदिर संस्थानच्या वतीने आज यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तसेच, संस्थानने माध्यमांना सोबत घेऊन येथील प्रसादाचा लाडू बनण्याची संपूर्ण प्रक्रियेची पाहणी केली. 


आंध्र प्रदेशातील तिरुपती प्रसादाचा वाद ताजा असतानाच सिद्धीविनायक मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून नव्या वादाला तोंड फुटले आहे. नुकताच आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांची चरबी मिसळल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोवर आता सिद्धीविनायक मंदिरातील प्रसाद शुद्धतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण, येथील मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये चक्क उंदरांची पिल्ले असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर, मंदिर संस्थानच्यावतीने स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 


मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील लाडूच्या प्रसादात उंदीर असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर आज सिद्धीविनायक मंदिर संस्थानच्या वतीने यावर स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदरचा व्हिडीओ हा या मंदिरातील नाहीच, याबाबत डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येईल, असे न्यासचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर आणि न्यासच्या कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी दिली. तसेच, इथे प्रसादाबाबत कशी काळजी घेतली जाते याबाबतची माहितीदेखील त्यांनी दिली. यावेळी, सिद्धीविनायक मंदिर प्रसादाचे लाडू जिथे बनविले जातात, त्या किचनची माध्यमांसह पाहणी देखील करण्यात आली आहे. 


व्हिडिओत काय दिसते


समोर आलेल्या व्हिडीओनुसार, सिद्धीविनायक प्रसादाच्या पाकिटांवर उंदराची पिल्लं दिसत आहेत. लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदराने पिल्लं दिली आहेत. प्रसादाचे लाडू उंदरांनी कुरतडल्याचाही आरोप आता होत आहे. दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने हे आरोप फेटाळले आहेत.


प्रसादाचे लाडू उंदरांनी कुरतडल्याचाही आरोप


सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. समोर आलेला व्हिडीओ मंदिर परिसरातील नसून यामागे कोणाचं तरी षडयंत्र असल्याचं सरवणकर म्हणाले. कोणीतरी प्लॅस्टिकमध्ये उंदीर घालून ते प्रसादात ठेवले आणि त्याचा व्हिडीओ काढला असावा, असं सरवणकर म्हणाले. मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असल्याचंही ते म्हणाले.


प्रसादासाठी दररोज 50 हजार लाडू तयार केले जातात


सिद्धिविनायक मंदिरात दररोज सुमारे 50 हजार लाडू रोज बनवले जातात. प्रसादाच्या एका पाकिटात प्रत्येकी 50 ग्रॅमचे दोन लाडू असतात. सणासुदीच्या काळात प्रसादाची मागणी वाढते. प्रयोगशाळेच्या चाचणी अहवालानुसार, हे लाडू सात ते आठ दिवस साठवता येतात.