मुंबई :  भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर 7 जुलै रोजी दोघांनी नासधूस केली होती. राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या होत्या तसंच घरातील कुंड्यांचीही नासधूस केली होती. या प्रकरणी पोलिसांनी 15 दिवसानंतर तोडफोड करणाऱ्याला अटक केली आहे. विशाल अशोक मोरे उर्फ विठ्ठल काल्या याला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून त्याला बुधवारी अटक करण्यात आली. राजगृहाबाहेरील परिसरात मोफत जेवण मिळत असल्याने मोरे तिथल्या समोरच्या पदपथावर राहायचा. मात्र घटनेच्या आदल्या दिवशी त्याला हटकले, त्या रागातून त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

सात जुलैला सायंकाळी घडलेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी सोबत असणाऱ्या उमेश जाधव याला यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. जाधव परेलचा रहिवाशी असून बिगारी काम करतो. जाधवच्या चौकशीतून तोडफोड करणाऱ्याचे नाव काल्या असल्याचे समोर आले. लाॅकडाऊन दरम्यान जेवण वाटप होत असताना त्याची काल्यासोबत भेट झाली होती. दोघेही पदपथावरच राहायचे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस काल्यापर्यंत पोहोचले.

डॉ. आंबेडकरांच्या राजगृहाच्या बागेत नासधूस, प्रकाश आंबेडकरांकडून शांततेचं आवाहन

शांतता राखण्याचं प्रकाश आंबेडकरांचं आवाहन

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. आंबेडकर यांनी यासंदर्भात ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला होता. सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी त्यांचं काम चोख केलं. जनतेने शांतता राखावी आणि राजगृहाच्या आजूबाजूला जमू नये, अशी विनंती मी करतो, असं त्यांनी म्हटलं होतं.

'राजगृह'बाहेर आता 24 तास पोलीस संरक्षण, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती


महाराष्ट्रासह देशभरात  घटनेचा निषेध
दरम्यान महाराष्ट्रासह देशभरात या घटनेचा निषेध विविध संघटनांनी वेगवेगळ्या माध्यमातून केला. राज्यातील अनेक ठिकाणी काळ्या रिबन बांधून नागरिकांनी निषेध केला होता तर काही ठिकाणी आरोपीला शोधून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी निवेदनं देण्यात आली होती. तर घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी राग व्यक्त करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शासन करू असं आश्वासन दिलं होतं. तर 'राजगृह'बाहेर आता 24 तास पोलीस संरक्षण देणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं.

Rajgruha history | राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह; इतिहासावर एक नजर