मुंबई : फोन टॅपिंग आणि काही गोपनीय कागदपत्रं लिक केल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात आपल्याविरोधात कठोर कारवाई करु नये. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी प्रमुख मागणी या याचिकेतून केली आहे.


पोलीस दलातील बदल्यांसंबंधित महत्त्वाची कागदपत्र लिक करणं आणि अनेक राजकीय व्यक्ती आणि उच्च पदस्थ सरकारी अधिकाऱ्यांचे फोनकॉल्स विनापरवानगी टॅप केल्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. त्यावेळी शुक्ला राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. राज्याचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी या प्रकरणाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. ही गोपनीय माहिती शुक्ला यांनीच लिक केली असा आरोप यामध्ये केलेला आहे. 


Rashmi Shukla : समन्स पाठवून मानसिक छळ न करण्याच्या सूचना पोलिसांना द्या, रश्मी शुक्ला यांची हैदराबाद उच्च न्यायालयात धाव


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत जाहीर केलेल्या पत्रातही याचा उल्लेख केला होता. याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या गोपनीय माहिती विभागाकडून बीकेसीतील सायबर गुन्हे विभागात अज्ञात व्यक्तिंविरोधात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीवरुन त्यांना मुंबई पोलिसांनी एप्रिलमध्ये दोनवेळा चौकशीला हजर राहण्याचे समन्स रश्मी शुक्ला यांना बजावले होते. मात्र शुक्ला अद्याप चौकशीला हजर झालेल्या नाहीत.


CBI च्या विशेष पथकानं हैदराबादला जात रश्मी शुक्ला यांचा नोंदवला जबाब


याप्रकरणात मुंबई पोलिसांनी जाणीवपूर्वक माझ्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली आहे. पोलीस दलातील बदल्यांमध्ये अनेकदा मंत्री आणि राजकीय नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून कशाप्रकारे भ्रष्टाचार केला जातो हे मी पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे सांगितलं होतं. खरंतर यासाठी माझं कौतुक व्हायला हवं होतं, मात्र माझ्या विरोधात एफआयआर दाखल केला गेला आहे. याप्रकरणी पोलीस मला कधीही अटक करण्याची शक्यता आहे, त्यामुळे या याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन पोलिसांना माझ्याविरोधात कठोर कारवाई करण्यापासून रोखावं, अशी मागणी याचिकेतून केलेली आहे. यावर मंगळवारी हायकोर्टात तातडीची सुनावत होण्याची शक्यता आहे. हैदराबाद उच्च न्यायालयातही रश्मी शुक्ला यांनी याच आशयाची याचिका दाखल केली आहे.