मुंबई: दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मीच उमेदवार असेन, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआय आठवले गटाने हालचाली सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी रविवारी चेंबूर जिमखाना येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
यात त्यांनी मुंबईमधून आणि मुख्य म्हणजे शिवसेनेचे खासदार असलेल्या दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा लढविणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी आठवलेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत भाषण केलं. आठवले म्हणाले “जेव्हा कार्यकर्ते रक्त आठवतील, तेव्हाच लोक मला लोकसभेत पाठवतील”
दक्षिण मध्य मुंबई हा दलितांचा बालेकिल्ला आहे. मराठा आंदोलन सुरु असतानादेखील जळगाव आणि सांगली जिंकली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र मी बदनाम होणार नाही, असं आठवलेंनी नमूद केलं.
तर मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता मेगाभरती थांबवल्याचं सांगत, ही भरती होणारच असल्याचा दावा केला. मराठा समाजात शांतता रहावी म्हणून हा निर्णय घेतल्याचं आठवले म्हणाले.
खासदार राहुल शेवाळेंना आव्हान
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे खासदार शेवाळेंसमोर आठवलेंचं आव्हान असेल.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. यापूर्वी ते पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर शिर्डी येथे लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले 2009 मध्ये पराभूत झाले होते.
1998 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार लोकसभेत निवडून गेले होते. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील चेंबूर, अणुशक्तीनगर, धारावी, नायगाव, वडाळा हे आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले मानले जातात. या भागात आठवलेंच्या रिपाइंची संघटनात्मक बांधणीही आहे.
संबंधित बातम्या
रामदास आठवले मुंबईतून लोकसभा लढवणार, मतदारसंघही ठरला!