भिवंडी : एक महिन्यापूर्वी महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेत महाड तालुक्यातील तळीये गावात मुसळधार पावसात डोंगर कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 84 गावकऱ्यांचा बळी गेला. याच गावातील 23 वर्षीय पूजा कोंडलेकरच्या कुटूंबातील सर्वांचा बळी जाऊन ती एकटीच वाचली आहे. आज तिच्या शिक्षण, पालनपोषणसह विवाहाची जबाबदारी घेऊन भिवंडीतील भावांनी रक्षाबंधनच्या दिवशी तिच्याकडून राखी बांधून घेतली आहे. आता पूजाला दुःखांच्या डोंगरातून नवीन सुखाची वाट दाखवत भिवंडीतील भावांनी आधार दिल्याने तिच्याशी जिव्हाळ्याचं नवीन भावा बहिणीचं नातं जुळ्याचे पाहवयास मिळाले आहे. 


भिवंडीतील साई फाऊंडेशनच्या 50 कार्यकर्त्यांची टीम मदतीला पोहचली. एक महिन्यापूर्वी कोकणात पावसाने हाहाकार माजवून अनेकांचे बळी घेतले. त्यांनतर मानवतेच्या दृष्टीने राज्य भरातून शेकडो सामाजिक संघटनांनी कोकणात मदतीचा ओघ सुरु केला. तर काहींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. यामध्ये भिवंडीतील साई फाऊंडेशनच्या 50 कार्यकर्त्यांनी चिंपळूणसह आजूबाजूच्या दुर्घटनाग्रस्त गावांना भेटी देत, त्यांना अन्नधान्य व संसार उपयोगी साहित्य देऊन मदत केली. शिवाय त्यांच्या घरांची दुरुस्ती व साफसफाई करीत श्रमदानही केले होते. 



महाड तालुक्यातील तळीये गावावर डोंगराचा मोठा भाग कोसळला होता.  त्यामुळे काही लोक दरडीखाली जागीच दबले गेले. तर काही दरडीबरोबर वाहत गेले. अनेकांच्या अंगावर आणि घरांवर दरडीसोबत आलेली दगडं पडली, झाडे पडली, मातीचा ढिगारा पडला. जेवढे डोंगराच्या आडोशाला उभे होते, त्यातील एकही बचावला नाही. या गावातील ३५  घरेही जमीनदोस्त झाली. त्यामध्ये पूजाचेही घर होते. त्यांनतर २० दिवसांनी साई  फौंडेशनचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी यांना गावकऱ्यांनी संपर्क करून मदत मागितली. त्यावेळी पूजाची  व्यस्था त्यांच्या समोर आल्याने त्यांनी पूजाशी बहिणी भावाचं नातं निर्माण करून तीची संपूर्ण जबाबदारी घेऊन खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरा केला.