दापोली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी दापोली मुरुड समुद्रकिनारी असलेला बंगला तोडला आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील मुरूड येथील बंगल्यावर महसुल किंवा केंद्रीय पर्यावरण खाते यांनी कारवाई केली असल्याचं बोललं जात होतं. मात्र हे बांधकाम मिलिंद नार्वेकर यांनी स्वत: पाडून टाकले आहे. मुंबईतून त्यांनी तसे आदेश दिले होते. त्यानुसार ही बांधकाम पाडले गेले.   काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या बंगल्याबाबत पर्यावरण खात्याकडे तक्रार केली होती.  मुरुड दापोलीच्या समुद्र किनारी मिलिंद नार्वेकर यांचा अलिशान बंगला होता. हा बंगला पाडण्याचे काम काल सकाळीच केलं गेलं. 







आमदार वैभव नाईक यांचं भाजपला आव्हान
या कारवाईनंतर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. त्यांनी किरीट सोमय्यांना म्हटलं आहे की, मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी येणार असाल, तर सिंधुदुर्गमध्ये या आम्ही नारायण राणेंची अनधिकृत बांधकामे दाखवतो. मिलिंद नार्वेकरांना बंगला बांधताना CRZ कायद्याचं उल्लंघन झाल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ बांधलेला बंगला पाडण्यास सुरवात केली. अशा प्रकारे बांधलेला बंगला पाडण्याचं धाडस मिलिंद नार्वेकर यांनी दाखवून राजकारणात एक चांगला पायंडा पाडला आहे. सदर बंगल्याला स्थानिक तहसील किंवा तलाठी यांच्याकडून कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही, तरी किरीट सोमय्या चुकीची माहिती पसरवत आहेत, असं आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं. अनावधानाने का होईना बांधकाम अनधिकृत असेल, तर ते स्वत: तोडण्याचं धाडस आज मिलिंद नार्वेकर यांनी दाखवलं आहे. असं धाडस आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे दाखवणार आहेत का? नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू येथील 12 मजली बंगलाही CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधला आहे. तसेच नारायण राणे यांचे सिंधुदूर्गातही अनेक अनधिकृत CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधलेली बांधकामं आणि बंगले आहेत. ते आम्ही किरीट सोमय्या यांना दाखवू, असंही वैभव नाईक म्हणाले. 


'बेकायदेशीर बंगलो' सेना, किरीट सोमय्या यांनी काय आरोप केला होता


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डावा हात, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीच्या मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीर प्रशस्त बंगला बांधायला सुरुवात केली आहे. असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांचे बेकायदेशीर बंगले आहेत, त्यामुळे शिवसेना म्हणजे 'बेकायदेशीर बंगलो' सेना आहे अशी टीकाही भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली होती.  मुरुड गावात उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या रिसॉर्ट आणि बंगला बांधला आहे. ज्याची चौकशी सुरु आहे.


अनिल परब यांचा बेकायदेशीर रिसॉर्ट आणि त्याचा जवळील भव्य बंगल्यावर कारवाई येत्या काही दिवसात होणार आहे असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं होतं. याच समुद्रावर अनिल परब यांच्या पासून काही फूटाच्या अंतरावर मिलिंद नार्वेकर यांनी 72 गुंठा जागा खरेदी केली. त्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गैरकायदेशीररित्या भव्य दुमजली बंगल्याचे काम जोरात सुरु केले आहे. याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सोमय्या यांनी केली होती. बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात जंगलाची, झाडांची नासधूस सुरु आहे. तसेच मोठ्या प्रमाणात उत्खनन ही सुरु आहे.  या संबंधी महाराष्ट्र सरकारचे पर्यावरण सचिव व महाराष्ट्र तटीय नियमन क्षेत्र (CRZ) च्या अध्यक्षा श्रीमती मनिषा म्हैसकर यांना भेटून तक्रार केली आहे असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं होतं. या आधी समोरचा मुरुड (अलिबाग) येथे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नीच्या नावावर अशाच प्रकारचे बेकायदेशीररित्या 19 बंगले विकत घेतले आहेत असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला होता.