मुंबई : लॉकडाऊन आणि वाढती महागाई यामुळे सामान्य जनता त्रासली असताना वाढीव वीज बिलानेही (Light Bill) सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान बेस्ट कंपनीकडूनही (BEST Company) ग्राहकांना वाढीव वीज बिल पाठवण्यात आल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. याप्रकरणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्राहकांच्या बाजूने येत महापालिका आयुक्तांची भेटही घेतली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी बेस्टच्या वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर आयुक्तांना लिहिलेले पत्रही देण्यात आले आहे.




'बेस्टने परस्पर वाढवले दर'


बेस्ट कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला (Maharashtra Electricity Regulatory Commission) जो खर्च दाखवला आहे, प्रत्यक्षात तो खर्च न करता MERC कडून मंजूरी घेऊन बेस्टने परस्पर वीज दर वाढवण्याचं काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान वारंवार  बेस्ट अधिकार्‍यांशी चर्चा करून देखील यावर तोडगा निघत नव्हता. त्यामुळे महापालिका आयुक्तांची भेट घ्यावी लागल्याचंही मनसे नेत्यांनी सांगितलं.


'तोडगा काढण्यासाठी समिती नेमावी'


या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेने मुन्सिपल ऑडिटर समिती नेमावी. ज्यातून नेमका बेस्टने किती खर्च केला आणि त्यांच बील वाढवणं योग्य आहे का? हे ही स्पष्ट होईल. त्यामुळे त्वरीत ही समिती नेमण्याची मागणी मनसेने केली आहे. दरम्यान या समितीच्या अहवालानंतर ग्राहकांचे वीज दर कमी करावे किंवा अधिक घेतलेले पैसे परत करावे लागतील, असंही मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितले. 


महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha