Sanjay Raut on West Bengal CM Mamata Banerjee Mumbai Visit : पश्चिम बंगाल ईडी आणि सीबीआयला पुरून उरला, तसाच महाराष्ट्रही पुरून उरेल, असा विश्वास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी व्यक्त केल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. राऊत यांनी शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह काल ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीबाबत राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना माहिती दिली. 


शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात भाजपचे प्रमुख कार्यकर्ते म्हणजे, ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स, एनसीबी हे जे दहशतवाद निर्माण करत आहेत. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारचं महान कार्य हे भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्येही करत आहेत, असं मी कालच्या भेटीत दीदींना सांगितलं. त्यावर दीदी म्हणाल्या की, आम्ही त्यांना पुरुन उरलेलो आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रही या दहशतवाद्यांशी सामना करेल अशी खात्री आहे, असंही त्या म्हणाल्या. त्यांनी घोषणा दिली, 'जय बांगला, जय मराठा' अशी. ही दोन्ही राज्य एकत्रितपणे लढतील अन्यायाशी, असत्याशी आणि विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला."







"ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असल्या तरी खूप मोठ्या नेत्या आहेत. ज्याप्रकारे त्यांनी पश्चिम बंगालमध्ये एका वाघीणीसारखी झुंज दिली आणि सगळ्या लांडग्यांना पळवून लावलं, हे पाहता संपूर्ण देश ज्या प्रमुख लोकांकडे पाहतोय, त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. शरद पवार आहेत, ते सतत सर्वांना एकत्र घेऊन निर्णय घेत असतात. त्यामुळे नक्कीच शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांची भेट ही देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनंही महत्त्वाची आहे. कारण शरद पवारांच्या राजकीय उंचीचा, अनुभवा इतका आज एकही नेता आपल्या देशात नाही. त्यांचा अनुभव आणि व्यासंग प्रचंड दांडगा आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी शरद पवारांची भेट घेत असतील, तर त्याचं आम्ही स्वागत करतो.", असं संजय राऊत म्हणाले. "शरद पवारांच्या मतानुसार, जर समर्थ अशी आघाडी आपल्याला उभी करायची असेल, तर आपल्याला एकत्र यावंच लागेल.", असंही संजय राऊत म्हणाले.  


कालपासून (मंगळवार) मुंबई दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जी या आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. दुपारी 3 वाजता शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी ही भेट होणार आहे. दरम्यान काल मुंबईत दाखल झाल्यानंतर ममता बॅनर्जींनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं होतं. तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊतांची देखील भेट घेतली. यावेळी ममता यांनी 'जय बांगला, जय मराठा' असा नारा दिला. 


भाजप विरोधात तिसरी आघाडी होणार?


ऑगस्ट महिन्यात ममतांनी पहिला मोठा दिल्ली दौरा आखला. त्यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट टाळली होती. विशेष म्हणजे, संसद अधिवेशनाच्या निमित्तानं त्यावेळी शरद पवार दिल्लीत होते. पण त्यावेळी अरविंद केजरीवाल, कनिमोळी यांची भेट घेणाऱ्या ममतांनी पवारांची मात्र भेट घेतली नव्हती. त्यावेळी ममता बॅनर्जींनी जाणूनबुजून शरद पवारांची भेट टाळल्याचं बोलंलं जात होतं. राजकीय चर्चांमध्ये तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वासाठी पवारांचं नाव नेहमीच चर्चेत असतं. या पार्श्वभूमीवर या दोघांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे. ममता मुंबईसोबतच मोदींच्या वाराणसीवरही लक्ष ठेवून आहेत. लवकरच आपण वाराणसीत जाणार असल्याचं ममतांनी घोषित केलं आहे. मोदींचं वाराणसीत आपला जम बसवण्याच्या प्रयत्न ममता यांचा असणार आहे. 


उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला मदत करायला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ममतांप्रमाणेच केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही विस्ताराची मोठी योजना आखतोय. केजरीवाल गोवा, पंजाब, उत्तराखंड, गुजरात या राज्यांमध्ये विस्ताराची मोठी योजना आखत आहेत. त्यामुळे आता 2024 च्या या शर्यतीत नेमकं कोण पुढे येणार आणि कोण भाजपला टक्कर देऊ शकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा