नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये काम करणाऱ्या कष्टकरी माथाडी कामगारांचे राहणीमान उंचावणार असून चाळीतून थेट 40 मजल्याच्या टॉवरमध्ये त्यांना घर मिळणार आहे. घणसोली येथील माथाडी कामगारांच्या 180 चौ फूटाच्या घरांचा पुनर्विकास होणार असून त्यांना 450 चौ. फूटाचे अलिशान घर पदरात पडणार आहे. यामुळे गेल्या 20 वर्षापासून वनरूम किचन मध्ये राहणाऱ्या माथाडी कामगारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
एपीएमसी मार्केट , तळोजा येथील स्टील मार्केट , मुंबई मधील लोखंड बाजार अशा विविध ठिकाणी काम करणाऱ्या माथाडी कामगारांना नवी मुंबईत घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. वनरूम किचन असलेल्या 180 चौ फूटांच्या लहान घरात गेल्या २० वर्षापासून येथील कामगार राहत आहेत. खुराड्यागत असलेल्या घरात आईवडील , पती पत्नी आणि मुलांबरोबर दिवस काढावे लागत आहेत. घरात पाच ते सहा माणसे होत असल्याने झोपायलाही जागा पुरत नाही. यामुळे नाईलाजास्तव वृद्ध आईवडील गावाकडे रहायला जात असल्याचे विदारक चित्र या माथाडी चाळीत पहायला मिळत आहे. जर पुनर्विकासात घर मोठे झाल्यास आम्हाला एकत्र कुटुंबात राहता येईल त्यामुळे नातवांना आजी आजोबाचे प्रेम मिळेल अशी आशा माथाडी कामगारांना आहे.
एकीकडे वनरूम किचन त्यात पाच सहा माणसे. यामुळे मुलांना निट अभ्यासही करता येत नाही. घरात स्वयंपाक करताना आवाज होतो. चर्चा करताना आवाज होतो. यामुळे घराबाहेर, टेरेसवर जावून अभ्यास करायची वेळ मुलांवर येत आहे. दुसरीकडे घर लहान असल्याने आपल्याकडे पाहुणे येत नसल्याची खंत येथील रहिवाशांना आहे. या आलेल्या मर्यादा पाहता आपल्या घरांचे पुनर्विकास करण्याचा निर्णय घणसोली येथील माथाडी कामगारांनी घेतलाय. सिम्प्लॅक्स कॉलनीमधील सहा सोसायट्यांनी एकत्रीतरित्या पुनर्विकासाला पसंती दिली आहे. 3 हजार 200 घरांची संख्या असून सर्वच सोसायटी मधील रहिवाशांनी खाजगी बिल्डरच्या माध्यमातून पुनर्विकासाला ग्रीन सिग्नल दिला असल्याने याच्या कायदेशीर परवानगीला सुरवात झाली आहे. सहा सोसायटीच्या जागेत पुनर्विकासामुळे टोलेजंग 40 मजल्याचा टॉवर उभा राहत आहे. या टॉवरमध्ये 450 चौ फूटापेक्षा जास्त जागेचे घर माथाडी कामगारांना मिळणार आहे. यामध्ये दीड ते दोन बीएचकेचा समावेश आहे. सरकारकडून माथाडी कामगारांच्या घरांसाठी ज्या काही कायदेशीर परवानग्या द्यायच्या आहेत त्याबाबत सर्व ती मदत करणार असल्याचेमुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, म्हाडाचे अध्यक्ष विजय नाहटा यांनी माथाडी कामगारांना शब्द दिला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :