Raj Thackeray Speech : मनसेकडून आज गुढीपाडव्यानिमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) शिक्षण आणि डॉक्टरांना कामाला लावल्यावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, जवळपास पाच वर्षानंतर महाराष्ट्रात निवडणुका होत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका आता होतील असे म्हणता म्हणता अजूनही होत नाहीत. त्यामुळे 2019 ला झालेल्या निवडणुकीनंतर 2024 साली निवडणुका होत आहेत. सगळे आचारसंहिता वाले जागे झालेत. काल मी बातमी वाचली की महापालिकेचे जेवढे हॉस्पिटल आहेत. त्यातील डॉक्टर आणि नर्सेसला निवडणुकीच्या कामावर जुंपवले.
ते डॉक्टर काय मतदारांची नाडी बदलणार का?
ते डॉक्टर काय मतदारांची नाडी बदलणार का? नर्सेस मतदारांची डायपर बदलणार? ज्यासाठी त्यांची नेमणूक केलीय, ज्या रुग्णांसाठी त्यांची नेमणूक केली, तिथे ते नसावेत का? निवडणुका होणार आहेत ही गोष्ट निवडणूक आयोगाला प्रत्येक वेळेला माहिती असते. त्यामुळे एक फळी का उभी नाही करत तुम्ही? असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला.
तुम्हाला कामावरुन कोण काढतं तेच पाहतो
प्रत्येक वेळेला शालेय शिक्षक, नर्सेसची नेमणूक करायची. आता डॉक्टर्स घ्यायचे हे काय चाललंय. मी तुम्हाला आताच ज्या डॉक्टर आणि नर्सेसवर ही निवडणुकीची जबाबदारी टाकलेली असेल, तिथे त्यांनी जाऊ नये. ज्या रुग्णांची सेवा तुम्ही करताय तिथे तुम्ही जा, काम करा, तुम्हाला कोण काढतं ते मी बघतो, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
मी जे अपत्य जन्माला घातलंय, त्याच पक्षाचा मी अध्यक्ष राहीन
राज ठाकरे पुढे म्हणाले की, मी जे अपत्य जन्माला घातलंय, त्याच पक्षाचा मी अध्यक्ष राहीन. तसेच माझ्यात आणि भाजपमध्ये जागावाटपाची चर्चा झाली, अशाही बातम्या ऐकायला मिळत आहेत. मी जागावाटपाच्या चर्चेला शेवटचा 1995 मध्ये बसलो होतो, या वाटाघाटी करण्याचा संयम माझ्यात नाही. मी मनसेच्या रेल्वे इंजिन या चिन्हाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असे त्यांनी सांगितले.