Raj Thackeray And Uddhav Thackeray: मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यापासूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी इच्छा राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसैनिकांकडून केली जात आहे. राज्याच्या राजकाणात नाही, मात्र आज एका कौटुंबिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे यांच्या भाच्याच्या साखरपुड्यात हे दोन्ही भाऊ एकाच फ्रेममध्ये दिसून आले. आज मुंबईतील दादरमध्ये राज ठाकरे यांच्या भाच्याचा साखरपुडा समारंभ पार पडला. याच कौटुंबिक कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकेर एकत्र आले होते. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आलेच. निमित्त होतं, राज ठाकरेंच्या भगिनी जयवंती आणि अभय देशपांडे यांच्या मुलाच्या साखरपुड्याचं. राज ठाकरेंचा भाचा यश देशपांडेच्या साखरपुड्याच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. या साखरपुडा समारंभासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं. मुंबईतील दादर येथील एका सभागृहात हा साखरपुडा समारंभ पार पडला. याच कौटुंबिक कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसून आले. 


गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या मनातील इच्छा एका कौटुंबिक कार्यक्रमामुळे पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांनी दोन्ही भावांनी एकत्र यावं असा सूर आवळला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आजची भेट बरंच काही सांगून जाणारी आहे. उद्धव ठाकरेंनी साखरपुडा समारंभाला हजेरी लावली, भाच्याला आणि ठाकरेंच्या होणाऱ्या नव्या सुनेला आशीर्वादही दिले. यावेळी उद्धव ठाकरेंनी संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली. 


कौटुंबीक समारंभात दोन्ही भावांमध्ये चर्चा 


साखरपुडा समारंभासाठी उपस्थित असलेल्या काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांमध्ये या कार्यक्रमात चर्चा झाली. कौटुंबीक कार्यक्रमांमध्ये दोन्ही भावांनी एकमेकांची विचारपूस केली. तसेच, या कार्यक्रमात रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचीही भेट झाली. त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या मातोश्रींसोबत संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली. 


दरम्यान, राजकीय घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून दोन भावांमध्ये जो दुरावा निर्माण झाला होता. तो आजच्या कौटुंबीक कार्यक्रमातील भेटीमुळे कुठेतरी दूर झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिक या भेटीकडे एक सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहेत. 


पाहा व्हिडीओ : Raj Thackeray Meet Uddhav Thackeray: अखेर भाच्याच्या साखरपुड्यासाठी राज-उद्धव एकत्र