मुंबई :  कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना ईडी (सक्तवसुली संचालनालय) ने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावल्यानंतर काल त्यांची साडेआठ तास चौकशी करण्यात आली. राज ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं वजन पाहता दिल्लीहून ईडीचे विशेष संचालकही मुंबईत आले होते. याशिवाय गोवा आणि गुजरातच्या दोन सहसंचालकांनीही मुंबईत ठाण मांडलं होतं.


2005 मध्ये कोहिनूर सीटीएनएल या कंपनीत आयएल अँड एफएसनं 225 कोटी गुंतवून 50 टक्के भागीदारी घेतली होती. 2008 मध्ये आयएलअँडएफएसनं आपले शेअर्स सरेंडर केले. पण त्याबदल्यात मिळाले फक्त 90 कोटी. म्हणजे 135 कोटीचा तोटा. पण त्याच वर्षी राज यांनीही आपली भागीदारी काढून घेतली, पण त्यांना मिळाले 80 कोटी. मग एकाच वर्षी भागीदारी काढून घेणाऱ्या राज यांना फायदा आणि आयएलअँडएफएसला तोटा कसा झाला? याची चौकशी करण्यासाठी ईडीनं राजना बॅलार्ड पियर्सच्या कार्यालयात बोलावलं होतं. तिथं त्यांची साडेआठ तास चौकशी झाली.

यावेळी सत्यव्रत कुमार हे ईडीचे सहसंचालक चौकशी करण्यासाठी हजर होते. त्यांच्यासह एक उपसंचालकही राज ठाकरेंना प्रश्न विचारत होते. दुपारी 12 वाजता राज ठाकरे यांची चौकशी सुरु झाली तेव्हा राणा बॅनर्जी नावाचे अधिकारीही तिथं होते. हे तेच राणा बॅनर्जी आहेत ज्यांच्या फेसबुक अकाउंटवर ते अमित शाह यांचे फॅन असल्याचं नमूद होतं. मनसे कार्यकर्त्यांनी याचा सोशल माध्यमात प्रचार सुरु केल्यानंतर त्यांनी अकाऊंट बंद केलं.

तब्बल 4 तास राज ठाकरे यांच्याशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सवाल जबाब केले. कोहिनूर सीटीएनएलमधील व्यवहारात त्यांचा नेमका काय रोल होता? कोहिनूरमधील भागीदारी, त्यात गुंतवलेला पैसा आणि मिळालेला नफा याचा व्यवहार कसा झाला? हे त्यांना विचारण्यात आलं.

तसेच उन्मेश जोशी आणि राजन शिरोडकरांच्या चौकशीतून निर्माण झालेले प्रश्न विचारण्यात आले. घरी सोडण्यापूर्वी राज ठाकरेंच्या जबाबावर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. सात वाजता राज यांची चौकशी पूर्ण झाली होती. मात्र त्यानंतर ईडीचे विशेष संचालक आणि सहसंचालक यांची राज यांच्या जबाबावर दीर्घ चर्चा झाली आणि त्यानंतर राज यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

काय आहे प्रकरण?

काही वर्षांपूर्वी एनएमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत गेतली.

उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते.

उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिल होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.

VIDEO | 'लाव रे तो व्हीडिओ'मुळे राज ठाकरेंना नोटीस? | माझा विशेष

संबंधित बातम्या