मुंबई : एलफिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर अखेर रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. मंबईतील 122 रेल्वे स्थानकांचं ऑडिट केलं जाणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या 75 तर पश्चिम रेल्वेच्या 47 स्थानकांचा समावेश आहे. त्यासाठी 13 विशेष पथकं नेमण्यात आली आहेत. गर्दीच्या वेळी ही पथकं स्थानकांच्या परिस्थितीचा आढावा घेतील.


एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी 29 आणि 30 सप्टेंबरला मॅरेथॉन बैठका घेतल्या आणि उपनगरीय स्थानकांचं सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारपासून 10 दिवस उपनगरीय स्थानकांचं सुरक्षा ऑडिट होणार आहे.

चेंगराचेंगरीत मुंबईकरांचा बळी

एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले. सकाळी 9.30 च्या सुमारास फूट ओव्हर ब्रीजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रीज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.

एलफिन्स्टन-परेलला गर्दी का होते?

परेल आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांवर सकाळच्या वेळी कायमच प्रवाशांची गर्दी असते. अनेक ऑफिस या भागात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकरदार या भागात लोकलने येतात. गेल्या काही वर्षांत प्रवाशांची संख्या वाढलेली आहे, मात्र ब्रिजची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने काहीच प्रयत्न झालेले नाहीत.

उद्या दसरा असल्यामुळे अनेक जण खरेदीसाठी दादर आणि परिसरात जातात. सकाळच्या वेळेत असलेली गर्दी आणि त्यातच दोन्ही मार्गांवर लोकल आल्यास अचानक उडणारी झुंबड नेहमीची आहे. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाल्याचं म्हटलं जात आहे.

प्रवाशांच्या तुलनेत ब्रिजची क्षमता कमी असल्यामुळे गर्दीच्या वेळी पुलावर ताण वाढतो, अशी ओरड नेहमीच प्रवाशांकडून होते. त्याकडे प्रशासनाकडून लक्ष न दिलं गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

या घटनेनंतर स्थानिक रहिवासी आणि रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मृतांविषयी हळहळ व्यक्त केली जात असतानाच या अपघातासाठी प्रशासनाला जबाबदार ठरवलं जात आहे.

संबंधित बातमी : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांचा आकडा 23 वर