मुंबई : कोरोना व्हायरसच्या साथीविरूद्ध लढण्यासाठी वेगवेगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सध्या पर्सनल प्रोटेक्शन ईक्विपमेंट म्हणजे पीपीई सूटचा तुटवडा जाणवत आहे. नेमका हा तुटवडा भरुन काढण्यासाठी आता रेल्वेही पुढे सरसावली आहे. पश्चिम रेल्वेने उच्च दर्जाचे पीपीई सूट बनवले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे पश्चिम रेल्वेने बनवलेले हे पीपीई सूट आरोग्य मंत्रालयाच्या निकषानुसारच बनवले आहेत. मुंबईतच रेल्वेच्या परळ आणि महालक्ष्मी येथील वर्कशॉपमध्ये या पीपीई सूटची निर्मिती करण्यात आली आहे.


सध्या लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतूक बंद असली तरी रेल्वेने कोरोना व्हायरसच्या विरूद्ध सुरु असलेल्या लढाईत अनेक पातळ्यांवर योगदान दिलंय. रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असली तरी रेल्वेने मालवाहतूक आणि पार्सल सुरु ठेवलीय. या माध्यमातून देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुलभ होत आहे. रेल्वेचे अनेक डबे कोरोना पेशन्टसाठी आयसोलेशन कक्षही म्हणूनही सज्ज करण्यात आले आहेत. रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये दररोज दोनशे ते सव्वा दोनशे पीपीई सूटची निर्मिती होत आहे. लवकरच पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी वर्कशॉपमध्येही दररोज 200 पीपीई सूटची निर्मिती केली जाणार आहे.


Coronavirus | राज्यात आज 394 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा आकडा 6817


नियमानुसार पीपीई सूटची निर्मिती
लोअर परळ आणि महालक्ष्मी मध्ये बनवल्या जाणाऱ्या पीपीई सूटचा वापर रेल्वेच्याच बाबू जगजीवनराम हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी होणार आहे. रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये बनवण्यात आलेल्या पीपीई सूटसाठी वापरण्यात आलेलं फॅब्रिक्स म्हणजे कपडा कोईम्बतूरच्या सिट्रा म्हणजे साऊथ इंडिया टेक्स्टाईल रिसर्च असोशिएशनने प्रमाणित केलेला आहे. देशभरात वापरल्या जाणाऱ्या पीपीई किटसाठी फॅब्रिकसह वेगवेगळं साहित्य प्रमाणिक करणारी सिट्रा ही एकमेव संशोधन संस्था आहे. सिट्राने गेल्या दोन महिन्यात उच्च दर्जाच्या पीपीई सूटसाठी वापरता येतील अशी आठ प्रकारची सामुग्री प्रमाणित केली आहे. देशातच बनवलेल्या पीपीई सूटला प्रमाणीकरणाची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे पीपीई सूट आयात करण्याच्या खर्चात मोठी बचत झालीय.


कोटामध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा हिरवा कंदील


आपल्या महाराष्ट्रातच यापूर्वी नाशिक आणि इचलकरंजी येथील टेक्स्टाईल उद्योजकांनीही पीपीई सूटची यशस्वी निर्मिती केलीय. मुंबईत बाबू जगजीवनराम हॉस्पिटल हे रेल्वेचं देशातलं एकमेव कोविड हॉस्पिटल आहे. या ठिकाणी 172 पेशंटला अॅटमिट करुन घेण्याची सुविधा आहे. लोअर परळ येथील वर्कशॉपने आतापर्यंत या रेल्वे हॉस्पिटलसाठी तब्बल 1050 पीपीई सूट बनवले आहेत.


Indian Railway | तीन मे पर्यंत देशातील सर्व रेल्वे सेवा बंदच राहणार, वांद्र्याच्या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण