मुंबई : मुंबईतल्या गोवंडी, मानखुर्द भागात पाणीपुरीच्या पुऱ्या बनवणाऱ्या 4 कारखान्यांवर एफडीए म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले आहेत.


एफडीएला मागील काही दिवसांमध्ये पाणीपुरीच्या पुऱ्या या स्वच्छ आणि हायजेनिक नसतात, अशी तक्रार वारंवार केली जात होती आणि याचाच आधार घेत आज पहाटे 4 वाजेपासून अधिकाऱ्यांनी हे धाडसत्र सुरू केलं.

या तक्रारी सत्य असल्याचं समोर आलं असून प्रत्येक कारखान्यातील काही पुऱ्या या तपासणी साठी नेल्या आहेत. या पुऱ्यांचा अहवाल आल्यानंतर संबंधित कारखाना मालकावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चटपटीत आणि खुसखुशीत पाणीपुरी पाहून आपल्याही पाणीपुरी खाण्याची इच्छा होते. पण पाणीपुरीची पुरी कशी बनते हे तुम्ही पाहिलं तर तुम्हालाही धक्का बसेल.

पाणीपुरीचा सर्वात महत्त्वाचा भाग पुरी. जिथे स्वच्छता या शब्दाला अजिबात किंमत नाही अशा गचाळ ठिकाणी ही पुरी तयार होते.

मुंबईतल्या गोवंडी आणि मानखुर्दमधल्या या पुऱ्यांच्या कारखान्यांमध्ये तर पीठ मळण्याचं मशिन अतिशय जुनं आहे. मळलेल्या पिठाच्या जेव्हा पुऱ्या तयार केल्या जातात त्या चक्क फरशीवर लाटल्या जातात.

अधिकाऱ्यांनी या 4 कारखान्यांमधल्या पुऱ्यांचे नमुने घेतले आणि कारवाईची तयारी सुरु केली आहे. कधी कुणीतरी पाणीपुरीच्या भांड्यात लघुशंका करतो. कुणी पाणीपुरी चटपटीत बनवण्यासाठी हार्पिक घालतो. आणि आता तर फरशीवरच्या पुऱ्या. एखादा पदार्थ बदनाम करण्याचा विषय नाही. इथं प्रश्न आहे तो तुमच्या आमच्या आरोग्याचा.

VIDEO: