मुंबई : मध्य रेल्वेवर आजपासून ट्रेन पकडण्यासाठी आता रांगेतच उभं राहावं लागेल. रेल्वे व्यवस्थापनाने सीएसटीसह सर्व महत्वाच्या स्थानकांवर प्रवाशांनी रांगेतच ट्रेन पकडावी असा नियमच लागू केला आहे. रांगेची ही शिस्त प्रवाशांनी स्वतःहून अंगिकारली नाही तर आरपीएफ म्हणजे रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रवाशांची रांग तयार करणार आहेत. याचा फायदा सर्वच मुंबईकर चाकरमान्यांना होणार आहे.


 

मध्य रेल्वेच्या अनेक प्रचंड गर्दीच्या समजल्या जाणाऱ्या स्थानकांवर ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली की आतील प्रवासी उतरायच्या आतच चढणाऱ्यांची झुंबड उडते. अशा वेळी एखाद्या नवीन प्रवाशाला येणाऱ्या स्थानकाची माहिती नसल्यास त्याला उतरताच येत नाही. त्याला नाईलाजाने पुढील स्थानकापर्यंत प्रवास करावा लागतो.
गर्दीच्या या रेटारेटीमुळे अनेकदा अपघात होण्याचीही शक्यता असते.

 

मध्य रेल्वेने आता यावर ट्रेनमध्ये रांगेतच चढण्याचा उतारा काढलाय. त्यासाठी प्रसंगी आरपीएफचीही मदत घेतली जाणार आहे.

 

खरं तर रांगेचा फायदा सर्वांना हे आपल्याकडे सुभाषितासारखं वापरलं जाणारं वाक्य. अनेकांना मनोमन पटतही असतं. मात्र ट्रेनमध्ये चढताना जवळपास प्रत्येक मुंबईकरांना त्याचा विसर पडतो. यामुळे ट्रेन पूर्णपणे प्लॅटफॉर्मवर थांबण्यापूर्वीच अनेक प्रवासी गाडीत चढण्यातही यशस्वी होतात. या गडबडीत अनेकांचा हात सुटून जीवावर बेतण्याची शक्यता असते.

 

'मुंबई मिरर' ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत पश्चिम रेल्वेवरील मीरा भायंदर स्थानकावरील प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे ट्रेन पकडण्यासाठी रांग लावायला स्वतःहूनच सुरूवात केली. त्याची बातमी छापून आल्यावर मग बदलापूर आणि कल्याण स्टेशनवरून ट्रेन पकडणाऱ्या प्रवाशांनी रांगेच्या शिस्तीचं अनुकरण केलं. यापूर्वी डोंबिवली स्थानकावर महिला प्रवासी रांगेतच ट्रेन पकडत.

 

प्रवाशांच्या स्वयंशिस्तीची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे आल्यावर रेल्वेने आता रांगेची शिस्त सीएसटी या मुख्य स्थानकावरही लावण्याचा निर्णय घेतलाय. हळू हळू सर्वच रेल्वे प्लॅटफॉर्मवर रांगेतच प्रवाशांना चढावं लागणार आहे. प्रवाशांना रांग लावण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान मदत करणार आहेत.
मध्य रेल्वेने घेतलेल्या रांगेच्या शिस्तीचं अनुकरण लवकरच पश्चिम रेल्वेही करणार आहे.

 

ट्रेनमध्ये चढण्यासाठी रांगेची शिस्त सध्या प्रायोगिक तत्वावर आहे, त्यामुळे पहिल्या वर्गाच्या महिला डब्यापुरतीच मर्यादित ठेवण्यात आलीय. मध्य रेल्वेच्या कल्याण आणि बदलापूर या स्थानकांवर कालपासून सुरू झालेली ही पद्धत डोंबिवलीतील महिला खूप आधीपासून अवलंबत आल्या आहेत. आता त्याची व्याप्ती वाढेल.
मध्य रेल्वेच्या अनेक महिला प्रवाशांनी या शिस्तीचं स्वागत केलं आहे.