ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अरुणा ढेरे यांना माझा सन्मान पुरस्कार जाहीर
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2016 06:07 PM (IST)
मुंबई: कवीयत्री, कादंबरीकार, लेखिका, समीक्षक अशा विविध क्षेत्रात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेल्या अरुणा ढेरे. त्यांच्या स्फुटलेख संग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांना एबीपी माझाच्यावतीने माझा सन्मान पुरस्कार जाहीर झाला. अरुणा ढेरे यांचा थोडक्यात परिचय पिता आणि गुरुच्या रूपात लाभलेली, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा.चिं. ढेरे यांची कृपा-साऊली; घरात, जमिनीपासून छतापर्यंत रचलेल्या पुस्तकांमुळे, ग्रंथांचा सहवास; आणि साहित्याने भारावलेलं एक विलक्षण वातावरण! त्यात भर म्हणून शब्दांवरचं त्यांचं प्रभुत्व, मानवी नात्यांतील आर्तता शोधणारी त्यांची संवेदना, आणि एका मातब्बर 'storyteller' चं उपजत 'timing!' डॉ. अरुणा ढेरे आपल्या लेखनाने वाचकाला मंत्रमुग्ध करणार हे ठरलंच होतं. सहा कवितासंग्रह, तीन कादंबरी, सहा कथा संग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक असे विविधांगी लेखन करणार्या डॉ. ढेरे या २१व्या शतकपूर्वीच्या काही दशकांतील अशा प्रकारच्या कदाचित एकमेव लेखिका म्हणता येतील. या शिवाय स्फुटलेख संग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांचा 'विस्मृतिचित्रे' हा ग्रंथ अतिशय गाजला. त्याच बरोबर 'अंधारातील दिवे', 'उंच वाढलेल्या गवताखाली' सारखी वैचारिक पुस्तकं; 'निरंजन', 'प्रारंभ','यक्षरात्र', यांसारखे कविता संग्रह; कृष्णकिनारा','नागमंडल','मैत्रेय' यांसारखेकथासंग्रह वाचकांच्या वाङ्मयीन प्रवासातील श्रद्धास्थानं बनली आहेत. अरुणाताई ... आपल्या लेखणीला नवनवीन कल्पनांची शाई सदैव मिळत राहो ... ही 'माझाची' सदिच्छा. संबंधित बातम्या