कल्याण : ठाण्यानंतर आता कल्याण डोंबिवली महापालिकेकडून देखील थायरोकेअर लॅबवर कारवाई होण्याची चिन्हं आहेत. लॅबने चुकीचे रिपोर्ट दिल्याचा आरोप झाल्यानंतर केडीएमसीनं थायरोकेअर लॅबला नोटीस बजावली आहे. नोटीसची मुदत संपूनही लॅबकडून उत्तर मिळालेलं नाही. कल्याणच्या शहाड परिसरात राहणारे शरद पाटील यांनी थायरो केअर लॅबने चुकीचे रिपोर्ट दिल्याचा आरोप केला आहे.


माहितीनुसार, पाटील हे मे महिन्यात घरातच पडल्यामुळे त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. हातावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्यामुळे आधी त्यांची थायरोकेअर लॅबकडून कोरोना टेस्ट करण्यात आली. 19 मे रोजी त्यांनी ही टेस्ट केली, ज्याचा रिपोर्ट 21 मे रोजी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना जायबंदी हातासह कल्याणच्या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. मात्र शरद पाटील हे अनेक दिवसात घराबाहेरच पडलेले नसल्यानं कोरोनाची लागण कशी झाली, याबाबत ते साशंक होते.




त्यामुळे त्यांनी दोनच दिवसांनी म्हणजे 23 मे रोजी पुन्हा एकदा मेट्रोपोलीस लॅबकडून कोरोना टेस्ट केली. ज्याचा 24 मे रोजी निगेटिव्ह रिपोर्ट आला. यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून तातडीनं डिस्चार्ज देण्यात आला. मात्र या सगळ्यामुळे थायरोकेअरनं दिलेले पॉझिटिव्ह रिपोर्ट सदोष असल्याबाबत त्यांची खात्री झाल्यानं त्यांनी लगेचच केडीएमसी आयुक्तांकडे याची लेखी तक्रार केली.




त्यानुसार केडीएमसीनं 1 जून रोजी थायरोकेअर लॅबला नोटीस बजावली असून 48 तासात समाधानकारक उत्तर न मिळाल्यास या लॅबवर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता 48 तास संपून 8 दिवस उलटून गेले तरीही थायरोकेअर लॅबने केडीएमसीच्या नोटीसला काहीही उत्तर दिलेलं नसून केडीएमसीनंही अद्याप या लॅबवर कारवाई केलेली नाही.


ठाण्यातही या लॅबमधून आणलेले पाच जणांचे covid-19 चे रिपोर्ट पॉझिटिव्ह होते मात्र त्यानंतर महानगरपालिकेने केलेल्या चाचणीत तेच रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कारवाई करण्यात आली होती.  या लॅबला ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चाचण्या न करण्याचे आदेश एका नोटीस द्वारे महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिले होते. आता कल्याण डोंबिवली महापालिकेनेही या लॅबवर कारवाई करावी, अशी मागणी पीडित पाटील दाम्पत्याने केली आहे.