मुंबई : एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातलेलं असताना राज्यात सचिव विरुद्ध मंत्री असा वाद रंगला आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अजॉय मेहता यांच्यावर मेहरबान असले तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मेहता नकोत. मुख्यमंत्र्यांनी याआधीच तिसर्यांदा मेहतांना कार्यकाळ वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारला पत्रं पाठवलं आहे. अजॉय मेहता यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कनेक्शन पाहता, तिसरी टर्म पदरात पाडून घेतील असे संकेत आहेत. पण त्याआधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेहतांविरोधात मोर्चेबांधणी केली आहे आणि याचाच प्रत्यय मागच्या कॅबिनेटमध्ये आला.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या खात्याचा प्रस्ताव सचिवांनी मंत्र्यांना विश्वासात न घेतल्याने सादर केल्याने खंडाजंगी झाली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस नेत्यांच्या बैठका सुरु आहेत त्यामुळे अजॉय मेहता यांच्याविरोधात वातावरण तयार झालं आहे.
कोण आहेत अजॉय मेहता?
- राज्याच्या प्रशासनात सध्या सर्वात ज्येष्ठ असलेले अजॉय मेहता हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
- ते सप्टेंबर 2019 मध्ये सेवेतून निवृत्त झाले.
- मात्र तोंडावर आलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीमुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली.
- निवडणुकांनंतर सर्व समीकरणं बदलली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.
- कोरोनाच्या संकटात लढताना उद्धव ठाकरेंच्या काळात अजॉय मेहतांना दुसरी टर्म मिळाली, ही टर्म येत्या 30 जून रोज संपतेय.
- पण तिसऱ्या टर्मसाठीच उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र पाठवलं आहे.
- अजॉय मेहता यांना तिसर्यांदा मुदतवाढ मिळाल्यास निवृत्तीनंतर सलग एक वर्ष मुख्य सचिव राहण्याचा रेकॉर्ड होईल.
तुकाराम मुंढे आणि अजॉय मेहता यांच्या बदलीसाठी काँग्रेस नेते आग्रही, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
सचिव विरुद्ध मंत्री वाद राज्यासाठी योग्य नाही!
सचिव विरुद्ध मंत्री हा वाद राज्याच्या हिताचा नाही. याआधी अजॉय मेहतांमुळे एकाच दिवस तीन वेळा निर्णय बदलण्याची नामुष्की सरकारवर आली होती. प्रविण परदेशी आणि अजॉय मेहता यांच्यामधला विस्तव विझत नव्हता, अखेर मेहतांनीच परदेशींचा काट काढल्याची चर्चा सुरु होती. त्यात उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या जवळचे असल्याने, इतर मंत्र्यांना विश्वासात न घेता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देणे अशा अनेक कारणांवरुन अजॉय मेहता नेहमीच चर्चेत राहिले. त्यामुळे अजॉय मेहता यांच्याबद्दलचा विरोध अधिक वाढत गेला.
मेहतांमुळे आयएएस लॉबीही नाराज?
अजॉय मेहतांमुळे नुसतेच नेते मंडळी नाही तर IAS लॉबीदेखील मोठ्या प्रमाणात नाराज आहे. कारण ठाकरेंच्या मेहता प्रेमामुळे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. संजय कुमार हे अजॉय मेहता यांच्याच 1984 च्या बॅचचे अधिकारी आहेत. मूळचे बिहारी असलेले संजय कुमार हे देखील अनुभवी आहेत. पण त्यांना मागील नऊ महिन्यांत मुख्य सचिव होण्याची संधी मिळाली नसल्याने त्यांच्यासारखे अनेक जण नाराज आहेत. त्यामुळे आता पुढे काय होतं यावर मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची नजर आहे.