मुंबई :  कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यु झाल्यास केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार सदर मृतदेह 'बॉडी बॅग' मध्ये ठेऊन अंत्यसंस्कारासाठी दिला जातो. बॉडी बॅग्सच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याच्या आरोपांनंतर मुंबई महानगरपालिकेवर हे कंत्राट रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती. केंद्र शासनाच्या निकषांनुसारच महापालिका रुग्णालयांसाठी 2200 बॉडी बॅग्जची खरेदी केली असल्याचे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेकडून देण्यात आलं आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसाठी करण्यात आलेल्या या बॉडीबॅग्जच्या खरेदीच्या अनुषंगाने समाज- माध्यमांवर चुकीची चर्चा सुरु आहे. तसेच भविष्यातील 'बॉडी बॅग्ज'ची संभाव्य गरज लक्षात घेऊन 23 मे 2020 रोजी काढण्यात आलेल्या निविदेला तांत्रिक दृष्ट्या सक्षम संस्थांचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने सदर निविदा प्रक्रिया रद्द करुन नव्याने निविदा काढण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपयोगात आणण्यात येणा-या 'बॉडी बॅग्स' या केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसारच घेतल्या गेलेल्या आहेत, असं बीएमसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महापालिकेद्वारे सदरहू बॉडी बॅग्स खरेदी करण्यासाठी संकेतस्थळाच्या मार्फत खुल्या पद्धतीने तीन वेळा स्वारस्याची अभिव्यक्ती (Epression of Interest) मागविण्यात आली. 10 एप्रिल 2020 रोजी मागविण्यात आलेल्या पहिल्या स्वारस्याच्या अभिव्यक्तीला प्रतिसाद न मिळाल्यामुळे 21 एप्रिल 2020 रोजी दुसऱ्यांदा स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यात आली परंतु त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे 2 मे 2020 तिसऱ्यांदा स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यात आली होती, असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.

केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या तांत्रिक निकषांची प्रतिपूर्ती करणाऱ्या उत्पादनाची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या स्तरावर उत्पादनाची तांत्रिक छाननी करण्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या नेमण्यात आलेल्या 'पॅनल' द्वारेही याबाबत तंत्रशुद्ध छाननी करण्यात आली होती. नियमानुसार तांत्रिक बाबींची पूर्तता करणाऱ्या व प्रतिसाद दिलेल्या देकारांपैकी सर्वात कमी रकमेची बोली देणाऱ्या संस्थेकडून बॉडी बॅग्ज खरेदी करण्यात आल्या, असं महापालिकेनं सांगितलं आहे.


निवड करण्यात आलेल्या उत्पादनाची केंद्र शासनाच्या संकतेस्थळावर किंमत ही रुपये 7  हजार 800 एवढी आहे. तथापि, महानगरपालिकेला सदरहू उत्पादन प्रति बॅग रुपये 6 हजार 700 या दरात उपलब्ध झाले आहे, ही बाब आवर्जून लक्षात घ्यायला हवी,असं पालिकेने म्हटलं आहे. महापालिकेच्या रुग्णालयांसाठी वेळोवेळीच्या गरजांनुसार आतापर्यंत 2 हजार 200 बॉडी बॅग्स खरेदी करण्यात आल्या आहेत, असं पालिकेने म्हटलं आहे.

कोरोनाबाधित मृतांसाठीच्या बॉडी बॅग्स निविदा प्रक्रियेत घोटाळ्याच्या आरोपानंतर BMCकडून कंत्राट रद्द

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करून 250 ते 1200 रुपयांची बॉडी बॅग तब्बल 6,719 रुपयांना खरेदी केली जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर मुंबई महापलिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कंत्राट तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले होते. अंजली दमानिया यांनी ट्विट करून मुंबई महानगर पालिकेने कोरोनाग्रस्त मृतांच्या बॉडी बॅग्सचे कंत्राट वेदांत इन्नोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिल्याची माहिती दिली होती. तसेच बाजार भावापेक्षा दहा पट चढ्या भावाने बॉडी बॅग्सची खरेदी केल्याचा धक्कादायक आरोप केला होता.  या कंपनीचे संचालक सतीश आणि वेदांत कल्याणकर असून त्यांचा मूळ व्यवसाय मेटल कास्टिंगचा असल्याचा दावाही त्यांनी केला. सोबत मुंबई महापालिकेचे मास्क्स, ग्लोव्हज, पीपीई किट, गॉगल्स आणि फेस शिल्डच्या ऑर्डरचे दरपत्रकही जोडले होते.