Pune MHADA Lottery : पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक)  पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 5 हजार 69 सदनिकांच्या विक्रीकरता ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते आज 'गो - लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत दिनांक 29 जुलै, 2022 रोजी सकाळी 10 वाजता पुण्यातील पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन, आगरकर नगर येथील कार्यालयात काढण्यात येणार आहे.  


सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता नियमावली , मार्गदर्शक सूचना या पुस्तिकेत नमूद करण्यात आल्या आहेत.  ही पुस्तिका https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व इच्छूक अर्जदारांनी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करण्याचे आवाहन पुणे मंडळातर्फे करण्यात आले आहे. 


काल 9 जून, 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून  9 जुलै, 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदार दिनांक 10 जून, 2022 रोजी सकाळी 10  वाजेपासून ऑनलाईन अर्ज करू शकतील. 10 जुलै, 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज  सादर करता येणार आहे.  11 जुलै, 2022 रात्री 11.59 पर्यंत ऑनलाइन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे. 12 जुलै, 2022 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. 


सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक 21 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे.   


सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण 1945 सदनिकांचा सोडतीत समावेश असून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 575 सदनिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत 1370 सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 279 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेतील 170 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २ हजार ६७५ सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  


सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन 'म्हाडा'तर्फे करण्यात येत आहे.