वांगणी : 'लॉकडाऊनच्या तीन महिन्यांत आमच्याकडे कुणीचं लक्ष दिलं नाही. बायकोला लॉकडाऊनच्या आधी दवाखान्यात दाखवून आणलं. बायको आठ महिन्यांची पोटुशी आहे. डॉक्टरांनी सांगितलं होतं पालेभाज्या खा. शरीरात रक्त कमी आहे. जर रक्त वाढलं नाही तर बाळाला त्रास होऊ शकतो. पण अडचण अशी आहे लॉकडाऊनमुळं व्यवसाय काहीच नाही झाला. जवळपास हजार पाचशे होते ते पहिल्याचं आठवड्यात संपले. मागच्या तीन महिन्यांत केवळ एक वेळ भात खाऊन जगतोय. आता मागच्या चार दिवसांपूर्वी गॅस संपला. मला आणि बायकोला स्टोव्ह पेटवता येईना. घरात थोडे फार तांदूळ आहेत. परंतु स्टोव्ह पेटवता न आल्यामुळे चार दिवसांपासून जेवलोचं नाही. दोघंपण उपाशीचं आहोत. शेजारीचं माझा मेहुणा विकास कसबे राहतो. दोघे आमच्या सारखेचं अंध आहेत. त्याला तर बायकोची अद्याप सोनोग्राफी देखील करता आली नाही. त्यांच्यापण घरातलं सगळं संपलंय त्यामुळे ते दोघे देखील चार दिवसांपासून उपाशीचं आहेत. अजून काही दिवस अशी परिस्थिती राहिल्यास फाशी घ्यावी लागेल'. ही व्यथा आहे. बदलापूर जवळ असणाऱ्या वांगणी गावातील अंध बांधव पाराजी भालेराव यांची.

ठाणे जिल्ह्यातील जवळपास 20 हजार लोकंवस्ती असणारं वांगणी हे गाव. गावात 550 च्या आसपास अंध बांधवांची घरे आहेत. मुंबईत दिवसभर लोकलमध्ये खेळणी विकून तर कधी भीक मागून हे सर्वजण आपलं पोट भरतात. परंतु लॉकडाऊन जाहीर झालं आणि सर्व ठप्प झालं. त्यामुळे या अंध बांधवांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत बोलताना स्थानिक रहिवासी बाळासाहेब शिंदे म्हणाले की, आमच्या अंध बांधवांपैकी जवळपास 70 टक्के लोकं लोकलमध्ये भीक मागून खातात. तर यातील काहीजण खाजगी कंपनीत कामाला जातात. सध्या लॉकडाऊन आहे. घरात छोटी छोटी मुलं आहेत. सध्या आमचं काम पूर्णपणे बंद असल्यामुळे आमच्यासह या चिमुरड्यांवर उपासमारीची वेळ आलीय.

नुकतंच महाराष्ट्र राज्यासाठी सध्याच्या परिस्थितीतून सावरण्यासाठी काही कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली. यातील एक दुर्दैवी बाब म्हणजे यामध्ये आमच्या अंध बांधवांसाठी काहीच तरतूद नसल्याचं समोर आलं. सध्या आम्हाला संजय गांधी निराधार योजने अंतर्गत काही पैसे मिळतात. परंतू ते कधीच वेळच्यावेळी मिळतं नाहीत. जानेवारीची रक्कम आता या महिन्यांत आमच्या खात्यावर जमा झालीय. आमची सरकारला इतकीच विनंती आहे कि, हा लॉकडाऊन अजून किती दिवस चालेल माहिती नाही. तसेच लोकल देखील कधी सुरू होईल माहिती नाही. त्यामुळे आम्हा अंधबांधवांना आत्मनिर्भर होता यावं यासाठी काहीतरी ठोस उपाय योजना करा, असं अंध बांधवांचं म्हणणं आहे.

याबाबत बोलताना विकास कसबे म्हणाले की, सध्या सर्वांना सोशल डिस्टन्स पाळा, एक मीटरचं अंतर राखा असं सांगण्यात येतंय. परंतु आम्हांला स्पर्श ज्ञानाशिवाय काहीच जमत नाही. मग आम्ही कसं सोशल डिस्टन्स पाळणार ? अशा वातावरणात सध्या ना आम्हाला खायला अन्न मिळतंय ना बाहेर पडण्याची परवानगी. त्यामुळे आम्ही आता जगावं कसं हा आमच्या समोर प्रश्न आहे.