मुंबई : कोरोनाच्या काळात खाजगी सेवा देणारे डॉक्टर आपल्या रुग्णालयांमध्ये सामान्य रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यातूनही कोरोना बाधित रुग्णांना ते वेगळी ट्रीटमेंट देत आहेत. यामुळे या डॉक्टर्सना कोरोनाची बाधा होत आहे. राज्यात आतापर्यंत अनेक डॉक्टर्स दगावले आहेत. केवळ ठाणे जिल्ह्यात पाच डॉक्टर्स कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. तर 75 डॉक्टरांना कोरोनाची लागण झालेली आहे. सध्या अनेक डॉक्टर रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे राज्यातील 45 हजार डॉक्टर्सना शासनाच्या विमा संरक्षण कवच योजनेत सामील करून घ्यावं, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रायव्हेट डॉक्टर्सनी केलेली आहे.


सरकारी डॉक्टर पेक्षा खाजगी डॉक्टरांना तीन पट अधिक कोरोनाची लागण झालेली आहे. असे निदर्शनात येत आहे. राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हे सर्व खाजगी डॉक्टर्स सेवा देत आहेत. कोरोना बाधित रुग्णाशी थेट संपर्क आल्यामुळे डॉक्टर्सना धोका निर्माण होत आहे. संपूर्ण राज्यात 45 हजार खाजगी डॉक्टर आपली सेवा बजावत आहेत. सेवा बजावत असताना राज्य शासनाने सरकारी डॉक्टरांसाठी 50 लाखांचा टर्म इन्शुरन्स दिलेला आहे. ही योजना खाजगी डॉक्टर्सना शासनाने लागू केलेली नाही. त्यामुळे शासनाने खाजगी डॉक्टरांचा विचार करून त्यांनाही या योजनेत सामील करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.


राज्यात दररोज किमान एक ते दोन डॉक्टरांचा मृत्यू
सरकारने मोठी ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे. जी खाजगी डॉक्टर्सना मिळत नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनचे जेवढे खाजगी डॉक्टर्स आहेत, त्यांचा इ.एम.आय सुद्धा भरायला तयार आहेत. फक्त शासनाने या पॉलिसीमध्ये या खाजगी डॉक्टरांचा सहभाग करावा अशी मागणी करण्यात येत आहे. यावर शासन केवळ विचार करत आहे. पण अजून प्रत्यक्षात कुठलाही निर्णय झालेला नाही. राज्यात दररोज किमान एक ते दोन डॉक्टर्स मृत्युमुखी पडत आहेत. त्यांच्या कुटुंबियांसाठी शासनाने विचार करून या योजनेचा लाभ त्यांना द्यावा अशी मागणी होत आहे.


कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनची गरज नाही, बीएमसीचे सुधारित आदेश लागू


विमा संरक्षण कवच खाजगी डॉक्टरांना सुद्धा देणे गरजेचं : संतोष कदम
सध्या कोरोना बाधित रुग्णांवर खाजगी डॉक्टर्सही उपचार करत आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे राज्यातील हजारो डॉक्टर्स सेवा बजावत असताना त्यांच्या जीवालाही धोका निर्माण झालेला आहे. यासंदर्भात आम्ही राज्य शासना सोबत चर्चा केली. ज्या पद्धतीने सरकारी डॉक्टर्सना सेवासुविधा आहेत. त्याच पद्धतीने खाजगी डॉक्टर्स नाहीत. शासनाने या सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आम्ही केली आहे. विमा संरक्षण कवच खाजगी डॉक्टरांना सुद्धा देणे गरजेचे असल्याचे डॉक्टर संतोष कदम (इंडियन मेडिकल असोसिएशन) म्हणाले.


कोरोना संक्रमण झालेल्या रुग्णांवर उपचार करत असताना डॉक्टर्सना सुध्दा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णांसोबत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी देखील डॉक्टर प्रयत्न करत असतात. आम्ही रुग्णसेवा देतो, पण ही सेवा देत असताना आमच्या मागे आमची कुटुंब देखील आहे. त्यांचा विचार करून राज्यातील खाजगी सेवा देणाऱ्या डॉक्टर्सना शासनाने त्यांच्या विमा योजनेत सहभागी करून घेणे तितकेच गरजेचे असल्याची प्रतिक्रिया डॉ प्रवीण पाटील यांनी दिली.


Rajesh Tope | कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या प्रत्येकाला 50 लाख रुपयांचे विमा कवच : राजेश टोपे