मुंबई : मुख्यमंत्र्यांनी आवाहन करून देखील अनेक खाजगी कंपन्यांनी अजूनही त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलेले नाही. त्यामुळे अजूनही लोकल रेल्वेच्या प्रवाशांची संख्या आधी इतकीच बघायला मिळते आहे. असे असल्यास कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी कशी होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे.
फेब्रुवारी महिन्यानंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खासगी आणि सरकारी कंपन्यांना कमीत कमी कर्मचारी ऑफिसमध्ये बोलवण्याचा सल्ला दिला. केवळ पन्नास टक्केच कर्मचारी कार्यालयात बोलवावे किंवा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते.
मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला खाजगी कंपन्यांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. सरकारने स्पष्ट निर्देश दिले असताना देखील खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात केलेली नाही. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे लोकल मधील प्रवाशांची संख्या. खरेतर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रवासी संख्येत घट होणे अपेक्षित होते. मात्र, संख्या तितकीच आहे जितकी मार्च महिन्यामध्ये होती.
दर दिवशी मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आकडेवारी
- जानेवारी महिन्यात जेव्हा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत होते - दररोज अंदाजे 13 लाख प्रवासी.
- फेब्रुवारी महिन्यात जेव्हा कालमर्यादा ठरवून सर्वांना मुभा देण्यात आली - दररोज अंदाजे 16 ते 17 लाख प्रवासी
- मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात - दररोज तब्बल 20 लाख प्रवासी
- मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटी - दररोज 20 ते 21 लाख प्रवासी
- 1 एप्रिलला - अंदाजे 21 लाख प्रवासी.
दर दिवशी पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आकडेवारी
- जानेवारी महिन्यात जेव्हा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत होते - दररोज अंदाजे 10 लाख प्रवासी,
- फेब्रुवारी महिन्यात जेव्हा काल मर्यादा ठरवून सर्वांना मुभा देण्यात आली - दररोज अंदाजे 16 लाख प्रवासी
- मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात - दररोज अंदाजे तब्बल 17 लाख प्रवासी
- मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटी - दररोज 16 ते 17 लाख प्रवासी
- 1 एप्रिलला - अंदाजे 16 लाख प्रवासी
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं की प्रवाशांच्या संख्येत कुठेही कमी झालेली नाही. म्हणजेच कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमसारखे पर्याय अजूनही सुरु केलेले नाहीत. अनेक कर्मचाऱ्यांनी मागणी करून देखील कंपन्या ही मागणी ऐकायला तयार नाहीत.
मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये कोविड 19 रुग्णांची संख्या वाढल्याचे महत्त्वाचे कारण लोकल मधील प्रवाशांची वाढलेली संख्या असे सांगण्यात आले. मात्र, खाजगी कंपन्यांनी जर कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केलीच नाही तर लोकल मधील प्रवासी संख्या देखील कमी होणार नाही.