मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. आज डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.


नवाब मलिक यांनी सांगितलं की, शरद पवार यांना सात दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे आणि 15 दिवसानंतर जर त्याचे शरीर चांगले साथ देत असेल तर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.






त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांना, कार्यकर्त्यांना आणि सर्व हितचिंतकांना विनंती आहे की, त्यांना बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असल्याने त्यांच्या भेटीस जाण्याचे टाळावे असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे. आपल्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल आणि शरद पवार यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.



Sharad Pawar Health | पित्तनलिकेच्या मुखाशी असलेला खडा काढण्यात यश, काही दिवसांनी होणार आणखी एक शस्त्रक्रिया : डॉ. मायदेव

शरद पवार (Sharad Pawar)  यांना गेल्या मंगळवारी पोटदुखी बळावल्यामुळं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.  मंगळवारी (30 मार्च) उशिरा रात्री पित्ताशयामध्ये (Gallbladder) अडकलेला मोठा खडा बाहेर काढण्यात आला. एन्डोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे शरद पवारांना पोटदुखीपासून आराम मिळणार आहे. मात्र, शरद पवारांच्या गॉल ब्लॅडरमध्ये छोटे-छोटे खडे असल्याने काही दिवसात त्यांचे गॉल ब्लॅडरही काढण्यात येणार आहे. यासंदर्भात देखील डॉक्टर निर्णय घेणार आहेत. दरम्यान, गॉल ब्लॅडर जरी शस्रक्रिया करुन काढण्यात येणार असले तरी हा अवयव काढल्यानंतर शरद पवारांचे काहीही नुकसान होणार नाही, अशी माहिती शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. मायदेव यांनी दिली होती. 


शरद पवारांच्या पित्तनलिकेच्या मुखाशी एक मोठा खडा अडकून बसला होता. ज्यामुळे त्यांना त्रास होत होता. त्यामुळे उद्या शस्त्रक्रिया करणं योग्य नव्हतं. त्यामुळे लगेच काही चाचण्या केल्यानंतर पित्तशयातील  तो खडा दुर्बिणीद्वारे काढण्यात आला. या शस्त्रक्रियेला अर्धा तास लागला, अशी माहिती डॉक्टर मायदेव यांनी दिली होती. दरम्यान, या शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या यकृतावरील ताण कमी होणार आहे. त्याचसोबत त्यांना थोडी काविळ देखील झाली होती, ती देखील कमी होण्यास मदत होईल असं देखील मायदेव यांनी सांगितलं होतं.