मुंबई : शाळा, महाविद्यालयानंतर आता प्राथमिक शाळाही लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. राज्यातील इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याबाबत सर्वच जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सकरात्मक असून पुन्हा शाळा सुरू करण्यावर जोर आहे. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोव्हीड टास्क फोर्स सोबत चर्चा करून लवकरच पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णयाची शक्यता आहे.


आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जवळपास सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करत असताना जिल्ह्यातील शाळांचा आढावा घेण्यासाठी ऑनलाइन बैठक घेऊन चर्चा केली. 


शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?



ह्या आव्हानात्मक काळात आपल्या शाळा मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या (CEO) बैठकीत सुरु झालेल्या शाळांचा जिल्हानिहाय आढावा, त्याअनुषंगाने तयारी, लसीकरण व नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा आढावा घेतला. 


या बैठकीत जवळपास सगळ्याच जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यावर जोर दिला.


मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.


राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा, यासाठी शासनाने 'आदर्श शाळा' हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले.


शाळांच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात मराठवाडा विभागातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती व पुनर्बांधणी केली. हा सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम असून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.


राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू 
राज्यात 4 ऑक्टोबरला तब्बल दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्या. राज्यभरात या निमित्तानं शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला. यात पाचवी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तर 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालयेदेखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.