मुंबई : पेट्रोलचे दर सध्या 80 रुपयांच्या घरात गेलेलं असताना यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पेट्रोल आता तब्बल 90 रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.


सीरियामध्ये आणि मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या अशांततेमुळे कच्च्या इंधनाचे दर कमालीचे वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

सध्या 72 डॉलर प्रतिबॅरल असलेलं क्रूड ऑईल 80 डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होऊ शकते. अशात अमेरिका आणि युरोपियन युनियनने सीरियासह तेलउत्पादक देशांवर आर्थिक निर्बंध घातल्यानं ही स्थिती आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

आधीच देशात पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले असताना मध्यपूर्वेतल्या या अस्थिरतेचा फटका भारतातल्या सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे.

कारण इंधनाचे दर वाढल्यानं प्रवासासह जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.