नवी मुंबई : मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांची पत्नी संजीवनी काळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. तीन दिवसांपूर्वी गजानन काळे यांनी मारहाण करत आपल्यावर प्रचंड अत्याचार केला असा आरोप संजीवनी यांनी केला होता. गजानन काळे यांच्या विरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा आणि कौटुंबिक अत्याचार गुन्हा नोंद केला आहे. मात्र तीन दिवस उलटून काळे यांच्यावर कारवाई होत नसल्याने संजीवनी काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


गजानन काळे यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा फायदा उचलून मोठ्या प्रमाणात काळी माया गोळा केली आहे. शिक्षण प्रवेश आणि मनपा अधिकाऱ्यांना धाक दाखवून करोडो रुपये गजानन काळे यांनी गोळा केले. याबाबत तपास होणार असेल तर आपण यंत्रणेला सगळी माहिती देण्यास तयार आहोत असेही त्यांनी सांगितले. घरात जास्त दिवस रोकड न ठेवता अन्य व्यक्तीच्या नावावर सर्व रोकड बँकेत जमा करायचा. ही रोकड घेऊन येणाऱ्या चार कार्यकर्त्यांची नावेही त्यांनी सांगितली आहेत. लाखो रुपये गोळा करून हे कार्यकर्ते घरी यायचे. एबी नावाच्या बोगस कंपनीच्या नावाने सर्व आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत. सदनिका, चार चाकी वाहने, मोबाईल अशा सर्व गोष्टींचे व्यवहार याच कंपनीच्या नावावर करण्यात आल्याचा गौप्यस्फोट संजीवनी यांनी केल्याने गजानन काळे यांच्या अडचणीत भर पडली आहे.


नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळेंवर पत्नीकडून गुन्हा दाखल, मानसिक, शारीरिक छळाचा आरोप


या अनैतिक व्यवहारांना आपला विरोध असल्याने गजानन काळे दमबाजी करत असल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला आहे. या प्रकरणी मनसेच्या नेत्यांनी साधी दखल घेतली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने त्यांनी गंभीर आरोप केला. पोलीस मध्यस्थी करून प्रकरण मिटवून टाकण्यासाठी दबाव टाकत आहेत. पती पत्नीमध्ये समेट घडवून आणतो असे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत आहेत, असं संजिवनी काळे यांनी म्हटलं.


गजानन काळे यांनी राजकीय पदाचा दुरुपयोग करून केलेल्या काळ्या कमाईची माहितीच त्यांनी पत्रकारांच्या समोर मांडली. करोडो रुपयांची सदनिका घेताना एवढा पैसा आला कुठून याची चौकशी केली तरी सगळे बिग फुटेल असा गौप्स्फोट त्यांनी केला. या प्रकरणानंतर दबावामुळे आपल्याला पाठींबा देण्यास कोणीही पुढे येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. कामगार संघटनेच्या मार्फत कामगार भरती करण्यासाठी लाखो रुपये उकळण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे, असंही संजिवनी काळे यांनी म्हटलं. 


गेल्या चार दिवसापासून गजानन काळे यांना अटक केली जात नसल्याने भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नवी मुंबई पोलीसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करत संजीवनी काळे यांना न्याय देण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. दरम्यान सर्व आरोपांबाबत गजानन काळे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल गेली चार दिवस झाले बंद येत आहे.