अंबरनाथ : दुचाकीस्वाराला भररस्त्यात हार्ट अटॅक आला अन तो गाडी चालवता चालवताच कोसळला. पण ऐनवेळी देवदूत बनून आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला रस्त्यातच सीपीआर देत त्याचा जीव वाचवला. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी ही घटना अंबरनाथ शहरात प्रत्यक्षात घडली आहे.


अंबरनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव हे 11 जुलै रोजी रात्री 8 च्या सुमारास त्यांच्या सहकाऱ्यांसह पोलीस व्हॅनमधून पेट्रोलिंग करत होते. कल्याण बदलापूर रस्त्यावर ते फिरत असतानाच अचानक एका किराणा दुकानाजवळ एक दुचाकीस्वार कोसळल्याचं त्यांना दिसलं. त्यामुळे त्यांनी तिथे धाव घेतली असता त्या इसमाला हृदयविकाराचा झटका आल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

त्यांनी तातडीने त्यांना प्रशिक्षणादरम्यान शिकवण्यात आलेली सीपीआर उपचार पद्धती वापरली आणि दुचाकीस्वाराच्या छातीवर जवळपास 15 मिनिटं त्यांच्या छातीवर दाब देत त्यांना शुद्धीवर आणलं. यानंतर त्यांना अंबरनाथ नगरपालिकेच्या छाया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दुचाकीस्वाराचं नाव राजेंद्र पांढरे (45) असून ते अंबरनाथ पश्चिम भागात राहणारे आहेत.

त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून केवळ देवदूतासारखे धावून आलेल्या पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव यांच्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. जाधव यांच्या या कामगिरीनंतर त्यांचं शहरातून आणि पोलीस दलातून कौतुक होतं आहे.