मुंबई : देशभरात डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत आंदोलन झाल्यानंतर काल पुन्हा एकदा मुंबईच्या नायर रुग्णालयात तीन निवासी डॉक्टरांवर हल्ला झाला आहे. रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्ण दगावल्यानंतर डॉक्टरांवर हल्ला केला आहे. इतकंच नाही तर सुरक्षारक्षकांनाही धक्काबुकी करुन रुग्णालयाची तोडफोड केली आहे.


या घटनेनंतर आता रुग्णाच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनीही डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
मुंबईच्या नायर रुग्णलयात राज किशोर दीक्षित यांची प्रकृती खालावली असताना काल रविवारी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. मात्र जेव्हा निवासी डॉक्टर रुग्णाच्या कुटुंबियांना सांगायला गेले, तेंव्हा अचानक नातेवाईकानी गोंधळ घालायला सुरवात केली आणि डॉक्टरांना मारहाण करायला सुरवात केली.

इतकंच नाही तर सेक्युरिटी गार्डलाही 12 ते 15 नातेवाईकांनी धक्काबुक्की केली, असा आरोप डॉक्टरांनी केला आहे. तर दुसरीकडे नातेवाईकांवर गुन्हा दाखल केल्यावर डॉक्टरांनी रुग्णाची स्थिती खालावली असतानाही आयसीयूमध्ये बेड नसल्याचं कारण देत अॅडमिट करुन न घेतल्याने आणि सलाईनची नळी डॉक्टरांच्याच हलगर्जीपणामुळे निघाल्याने रुग्णाचा मृत्यू झालाचा आरोप केला आहे.

आग्रीपाडा पोलिसांनी याबाबत नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला असून रुग्णाच्या भावाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर मार्डनेही निषेध नोंदविला असून पुन्हा एकदा सरकारला डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत लक्ष घालण्याची मागणी केली आहे.