मुंबई : पतीच्या कार्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्याचा निश्चय मनाशी बांधत पतीच्या निधनाच्या तिसऱ्या दिवसांपासून पतीने सुरु केलेल्या समुपदेशनाच्या सेवेत पत्नी उतरली आहे. मुंबई पोलिस दलात पोलीस निरीक्षक असलेले झेवियर रेगो यांचं 13 सप्टेंबर  2020 रोजी कोरोनामुळे निधन झालं. पत्नी मनीषा रेगो पेशाने डॉक्टर आहेत. कोरोना काळ सुरू झाल्यापासून पती-पत्नी सतत अहोरात्र आपलं कर्तव्य बजावत होते. पती झेवियर रेगो लोकांनी घरात राहावं म्हणून ते स्वतः रस्त्यावर उभे असायचे तर पत्नी मनीषा रेगो कोरोना रूग्णांना वाचवण्यासाठी अहोरात्र रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करायची.




मात्र, हे सर्व सुरू असताना झेवीयर रेगो आणि त्यांची पत्नी मनीषा रेगो यांना कोरोनाची लागण झाली. ज्यामुळे झेवीयर रेगो यांना आपला जीव गमवावा लागला. पतीच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्यासाठी मनीषा रेगो यांनी तिसऱ्याच दिवशी आपलं काम सुरू केलं. मनीषा रेगो या गायनकोलॉजिस्ट आहेत. सामजिक बांधिलकी आणि आपलं कर्तव्य म्हणून खूप काही करायचं आम्ही ठरवलं होतं, असं मनिषा रेगो यांनी सांगितलं. मात्र, झेवीयर रेगो यांच्या निधनानंतर त्यांची ईच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर होती, जी पार पाडण्यासाठी लगेच रुग्णांच्या सेवेसाठी हजर झाल्याचं मनीषा रेगो यांनी सांगितलं. क्वारंटाईन असल्याने बाहेर जाण शक्य नव्हते. म्हणून ऑनलाइन कन्सल्टंट सुरू करून क्वारंटाईनचा कालावधी संपताच रुग्णालयात पुन्हा रुजू झाल्या.




12 मे रोजी मनीषा रेगो यांच्या लग्नाचा 24 वा वाढदिवस होता. मनिषा रेगो यांनी या दिवशी कोवीड सेंटरमध्ये जाऊन रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसोबत हा दिवस साजरा केला. या दिवशी मनीषा रेगो यांनी आपल्या पतीच शर्ट, मुलीची पॅन्ट आणि मुलाच जॅकेट परिधान केलं होतं. ज्यामुळे त्यांचे पती त्यांच्यासोबत असल्याची भावना नेहमी त्यांच्या मनात असल्याचं मनीषा यांनी सांगितलं. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या बचावासाठी लोक पुरेशी काळजी घेत नसल्याची खंत मनीषा रेगो यांनी व्यक्त केली. तसेच त्यांच्या पतीने तर कोरोनामुळे जीव गमावला. मात्र, कुठल्याही कुटुंबावर अशी परिस्थिती येऊ नये म्हणून लोकांनी पुरेशी काळजी घेण्याची विनंती केली.