मुंबई : मुंबई महापालिकेच्या कामगिरीचं देशभरात कौतुक होत असलं तरीही मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यूदर जास्त असल्याचं आकडेवारीवरुन समोर येतंय. मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण स्थिरावले आहेत मात्र त्या तुलनेत रुग्णांच्या मृत्यूची मात्र घट होताना दिसत नाही. ही गोष्ट चिंतेची आहे. कोरोनाच्या संकटात मुंबई महापालिकेच्या व्यवस्थापनाचं सुप्रीम कोर्टासह निती आयोगाने कौतुक केलं. मात्र त्याच मुंबईत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसात मुंबईतला मृत्यूदर वाढतोय.
- 14 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान हा मृत्युदर 0.6 टक्के होता.
- 21 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान मृत्युदर 1.14 टक्क्यांवर पोहोचला.
- 28 एप्रिल ते 4 मे दरम्यान मृत्युदर 2.17 टक्क्यांपर्यंत पोहोचला.
- 5 मे ते 11 मे दरम्यान मृत्यूदर 2.27 टक्क्यांपर्यंत पोहोचला.
म्हणजेच मुंबईत सरासरी 2.03 टक्के मृत्युदर आहे. तर महाराष्ट्रात तो 1.48 इतका आहे. 15 एप्रिल दरम्यान महाराष्ट्राचा पॉसिटिव्हिटी रेट 15.8 टक्के होता. तर मुंबईचा पॉसिटिव्हिटी रेट 5.53 टक्के होता. सध्या महाराष्ट्राचा पॉसिटिव्हिटी रेट 17.36 टक्के आहे. तर मुंबईचा पॉसिटिव्हिटी रेट 1.58 टक्के आहे. विशेष म्हणजे मुंबईत कोरोनाचे मृत्यू लपवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
राज्यात अन्य कारणांमुळे होणारे मृत्यू नोंदण्याचे प्रमाण 0.7 टक्के आहे. मुंबईत हेच प्रमाण 39.4 टक्के इतके आहे. पहिल्या लाटेत सुद्धा हे प्रमाण उर्वरित महाराष्ट्रात 0.8 टक्के होतं. तर मुंबईत हेच प्रमाण 12 टक्के होतं.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत मुंबईतील संसर्ग दर कमी व्हावा, यासाठी कमी चाचण्या करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने होतो आहे, असाही भाजपचा आरोप आहे. मुंबईसारख्या शहरात जेथे आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता किमान 1 लाख इतकी आहे, तेथे केवळ सरासरी 34 हजार इतक्याच चाचण्या प्रतिदिन केल्या जात आहेत, असा दावाही भाजपने केला.
मुंबईतील कोरोना संसर्गाचा आलेख स्थिरावतोय, ही आपल्यासाठी समाधानाची बाब आहे. परंतू, मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर उर्वरित महाराष्ट्रच्या तुलनेत जास्त आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत मुंबईत चांगल्या आरोग्य सुविधा असताना मृत्युदर जास्त असणं हे गंभीर आहे. कोरोनाच्या संकटात मुंबईच्या व्यवस्थापनाचं कौतुक झालं पण या कौतुकात हुरळून जाताना मुंबईचा मृत्यूदर का वाढतोय? याची चिंता ही करायला हवी.